लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड, मालवणी, अंबोजवाडीमध्ये भरपावसात गेली दोन तोडक कारवाई करत २५० पेक्षा जास्त बांधकामे तोडली गेली. यामुळे येथील नागरिक बेघर झाली आहेत. पावसात भिजल्याने दोन मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. आमदार अस्लम शेख म्हणाले की, पावसाळ्यात कोणाचीही घरे तोडू नयेत, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. सरकारचाही स्वत:चा असा आदेश आहे. असे असताना अचानक नेमके काय घडले की प्रशासनावर भरपावसात घरे तोडण्याची वेळ आली.
पोलिस, पालिका किंवा जिल्हाधिकारी असो सर्व यंत्रणांना उच्च न्यायालयाचा व सरकारचा आदेश लागू होतो. त्यामुळे भरपावसात घरे तोडणाऱ्या या अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका शुक्रवारी त्यांनी विधानसभेत घेतली. येथील नागरिकांना आता उघड्यावरच राहावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
विधानसभेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसाळ्यात कधीच अशा प्रकारची तोडक कारवाई केली जात नाही. कारवाई का झाली याबाबत माहिती घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे शेख यांनी सांगितले.