भांडुप, कुर्ला, अंधेरीत मिळणार मुबलक पाणी; मनपा करणार १६२.८३ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:51 AM2024-02-16T10:51:28+5:302024-02-16T10:54:00+5:30

नवीन योजनांसाठी महानगरपालिका करणार १६२.८३ कोटींचा खर्च.

abundant water available in bhandup kurla and andheri municipal corporation will spend 162.83 crores in mumbai | भांडुप, कुर्ला, अंधेरीत मिळणार मुबलक पाणी; मनपा करणार १६२.८३ कोटींचा खर्च

भांडुप, कुर्ला, अंधेरीत मिळणार मुबलक पाणी; मनपा करणार १६२.८३ कोटींचा खर्च

मुंबई : भांडुप, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी, अंधेरी पूर्व आणि गोराई भागातील लोकांना दिलासा देणारे प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमुळे या भागातील पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळणार आहे. 

 नवीन जलवाहिन्या टाकणे आणि  पाणी साठवण टाक्या उभारणे या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा केली जाणार आहे. या योजनांसाठी एकूण १६२.८३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

मुंबईच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. डोंगराळ भागातील वस्त्यांच्या ठिकाणी पाणी वर चढण्यात अडचणी येतात. त्यामुळे पाऊस पुरेसा झाला, धरणात पुरेसा पाणी साठा असला तरी या भागांना १२ महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. काही भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे पाण्याची गळती होऊन पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे  रहिवाशांना पाणी टंचाईच्या कटकटीतून दिलासा देण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. गळती थांबविण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प हाती घेतले आहेत.  

कोणत्या भागात प्रकल्प?

भांडुप पश्चिम परिसरातील भांडुप टेकडी जलाशय क्रमांक -२ ते मंगतराम, पेट्रोल पंप येथील जुनी व जीर्ण झालेली जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. या ठिकाणी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भांडुप प्रतापनगर परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल.  तसेच ‘एस’ आणि ‘एन’ वॉर्डातील पाणी वितरणातील असमतोल दूर होईल. प्रकल्प जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. एकूण खर्च २२.७८ कोटी आहे.

पाणी गळती थांबणार :

 के-पूर्व विभागात अंधेरी पूर्वेकडे जलवाहिनी बदलून तेथे नवी वाहिनी टाकली जाणार असल्याने पाण्याची गळती थांबेल. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण केले जाणार असून,  ४०.१७ कोटी रुपये खर्च होतील. 

 गोराई गावातील उंचावरील भागातील पाणी पुरवठ्यासाठी शोषण टाकी, उदंचन केंद्र व जलवाहिनी टाकली जाणार असून त्यासाठी ९.४७ कोटी खर्च असून हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

टाकीसाठी १७ लाख खर्च :

 कुर्ला ‘एल’ वॉर्डात प्रमोद महाजन उद्यानामध्ये १४ लक्ष लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या उडनच टाकीचे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी १७.७ कोटी खर्च आहे. 

 ‘एन’ वॉर्डातील घाटकोपर पश्चिम व विक्रोळी पश्चिमेकडील आनंदगड, पंचशील सोसायटी, वर्षानगर व राम  नगर परिसराचा पाणीपुरवठा सुधरण्यासाठी विक्रोळी पार्क साईट, सी कॉलनी येथील शिवाजी मैदानात २२ लक्ष लिटरची टाकी बसवली जाणार असून त्यासाठी ७३.२४  कोटी खर्च आहे.

Read in English

Web Title: abundant water available in bhandup kurla and andheri municipal corporation will spend 162.83 crores in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.