ठाणे : सहकारी महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आणि सध्या पिंपरी-चिंचवडमधील चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसाजी काळे यांना ठाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.एच. झा यांनी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली.
काळे हे २००९ मध्ये ठाणे आयुक्तालयात कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका सहकारी महिलेची लैंगिक छळवणूक केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी न्या. झा यांच्या न्यायालयात झाली. आपल्याशी अंगलट करण्याचा प्रकार काळे यांनी केल्याची तक्रार पीडित कर्मचारी महिलेने केली होती. त्यांनी तिची अनुपस्थिती लावून तिच्याविरुद्ध पोलीस डायरीमध्ये शेराही मारला होता. घटनेच्या एक महिन्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून काळे यांच्यावर कारवाईचीही मागणी तिने केली. तसेच आयुक्तालयातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तिने दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी दाद दिली नाही. आपल्याविरुद्ध तक्र ार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच काळे यांनी तिच्याविरुद्ध पोलीस उपायुक्तांकडे रिपोर्ट पाठवला. त्यामुळे तिला एप्रिल २०११ मध्ये निलंबितही करण्यात आले. सतत दोन वर्षे त्रास झाल्यानंतर पुन्हा निलंबनाचीही कारवाई झाल्याने या महिला पोलीस कॉन्स्टेबलने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर, चौकशीचे आदेश देत न्यायालयाने विशाखा समितीच्या अध्यक्षा तत्कालीन पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे ही चौकशी सोपवली. दरम्यान, २०१२ मध्ये करंदीकर यांनी ठाणे प्रथम वर्ग न्यायालयात काळे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करून ५०९ आणि विनयभंगाच्या कलम ३५४ सह आरोपपत्र दाखल केले.
याबाबतची सुनावणी सुरू झाल्यानंतरही आरोपी काळे यांनी या महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिच्यावर खोटे आरोप करून निलंबन झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर तिला पुन्हा सेवेत घेतले. काळे हे अनेक सुनावणींना गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढले होते. या सर्व बाबी सहायक सरकारी वकील रश्मी क्षीरसागर यांनी न्यायालयासमोर मांडत आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली. मात्र, आरोपीचे वकील रवी कामत यांनी तिच्या निलंबनामुळेच हे खोटे आरोप केल्याचा न्यायालयात युक्तिवाद केला.पाच हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशदोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. झा यांनी २५ फेब्रुवारी रोजी काळे यांना दोषी ठरवत कलम ५०९ अन्वये दोन महिन्यांच्या कारावासाची तसेच १० हजारांच्या दंडाचीही शिक्षा ठोठावली. दहा हजारांमधील पाच हजार रुपये पीडित कर्मचारी महिलेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.