Join us  

मूल होत नाही, तर फक्त बायको कशी जबाबदार? मुंबईत विवाहित महिलांवरील अत्याचार सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 5:52 PM

गेल्या दहा महिन्यात मुंबई पोलिसांच्या दफ्तरी ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

मुंबई : ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही विवाहितांभोवती हुंड्यासाठी तसेच मूल होत नाही म्हणून मानसिक, शारीरिक छळ वाढत आहेत. गेल्या दहा महिन्यात मुंबई पोलिसांच्या दफ्तरी ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ५४७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दहा महिन्यांतील आकडेवारी कमी असली तरी अत्याचाराचा सूर पूर्णपणे थांबलेला नाही. छळ करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे.

आकडेवारी- 

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा महिन्यात मुंबईत महिलांसंबंधित ४,९६८ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी ४,५२१ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. 

१३९ गुन्ह्ये हुंड्याव्यतिरिक्त-

१५ जणींची हुंड्याव्यतिरिक्त विविध कारणांतून हत्या करण्यात आली आहे. तर १८ जणींनी अन्य तणावातून टोकाचे पाऊल उचलले आहे.  याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हत्येच्या १४ गुन्ह्यांत आरोपींवर कारवाई केली. तर, आत्महत्येप्रकरणी १४ प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले.

पोलिसांकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न -

  कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी आणि कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात.   महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार जोडण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे.   पोलिस उपायुक्त (महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा) हे महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी असून त्यांच्याअंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला साहाय्य कक्ष यांचा समावेश होतो.   कक्ष २ हा हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्भवणारे इतर गुन्हे, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ) अंतर्गतचे गुन्हे तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास तसेच याबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी आणि निपटारा करण्याचे काम करतात.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी