अपमानास्पद! विमानतळावर चेकिंगदरम्यान दिव्यांग तरुणीला व्हील चेअरवरून जबरदस्तीने उठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 07:07 PM2018-11-28T19:07:07+5:302018-11-28T19:08:14+5:30
अपमानास्पद वागणूक दिलेल्या तरुणीचं नाव विराली मोदी (वय 27) असं असून तिने ट्विटरवर आपली व्यथा मांडली आहे.
मुंबई - मुंबई विमानतळावर चेकिंगदरम्यान सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱ्याने दिव्यांग तरुणीला व्हील चेअरवरून जबरदस्तीने उठविले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अपमानास्पद वागणूक दिलेल्या तरुणीचं नाव विराली मोदी (वय 27) असं असून तिने ट्विटरवर आपली व्यथा मांडली आहे.
चेकिंगदरम्यान महिला कर्मचाऱ्याने आपल्याला जबरदस्तीने व्हील चेअरवरून उठवले. यामुळे पायात वेदना झाल्याचा आरोप या तरुणीने टि्वटवर केला आहे. त्यानंतर नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी तरुणीबरोबर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तर विराली यांचा अपमान केला नसून नियमित चेकिंगचा एक भाग असल्याचे सीआयएसएफने स्पष्टीकरण दिले आहे.
विराली सोमवारी जेट एअरवेजच्या फ्लाईटने मुंबईहून लंडनला निघाली होती. मात्र, विमानतळावर चेकिंगदरम्यान सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱ्याने विरालीची व्हिल चेअर स्कॅन केली. त्यानंतर तिने विरालीला उभे राहण्यास सांगितले. यावर पायाने अधू असल्याने उभे राहणे अशक्य असल्याचे विरालीने तिला सांगितले. तरी देखील महिलेने तिला उचलले व उभे केले. असे तिने तीनदा केले. यामुळे वेदना झाल्या व पायला सूज आली असे विरालीने आपल्या टि्वटमध्ये नमूद केले आहे.
I’m traveling to London from Mumbai via @jetairways and I had the most horrible experience with the CISF staff. After scanning my wheelchair, this insensitive woman was forcing me to stand up, even when I told her repeatedly that I couldn’t. Pt. 1
— Virali Modi (@Virali01) November 26, 2018