मुंबई - तुम्ही भारतीय रेल्वेच्या वातानुकूलीत (एसी) डब्ब्यातून प्रवास करत असाल. मात्र, त्यावेळी डब्ब्यातील एसी बंद असेल तर तुम्ही रेल्वेकडे यासाठी जाब विचारु शकता. तसेच रेल्वेकडून तुम्हाला तिकिटाचे पैसैही परत केले जाऊ शकतात. IRCTC रिफंड रुल्स 2018 नुसार रेल्वेतील एसी बंद असल्यास तुम्हाला तिकीटाचे पैसे परत मिळतील.
रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा वातानुकूलित डब्ब्यातील एसी बंद असल्याचे प्रकार घडतात. याबाबत आपण तक्रार केल्यास आपणास तिकीटाचे निश्चित पैसे परत केले जातात. पण, यासाठी रेल्वेने काही नियम आणि अटी घातल्या आहेत.
1 जर प्रवाशाने प्रथम वर्ग वातानुकूलित तिकीटाचे बुकींग केले असेल, तर या प्रवाशास प्रथम वर्ग तिकीट आणि प्रथम वर्ग वातानुकूलित या दोन्हीतील तिकीट दरात असलेल्या फरकाचे पैसे परत मिळणार आहेत.
2 जर, प्रवाशाने 2 टियर वातनुकूलित किंवा 3 टियर वातानुकूलित तिकीटाचे बुकींग केले असेल, तर त्या प्रवाशास शयनयान (स्लीपर कोच) डब्ब्यातील तिकीटदर आणि 2 टियर वातानुकूलित किंवा 3 टियर वातानुकूलित तिकीटांमधली फरकाची रक्कम परत केली जाते.
3 जर प्रवाशाने वातानुकूलित बैठक (चेअर कार) व्यवस्थेचे तिकीट बुकींग केले असेल, तर प्रवाशाला बैठक व्यवस्था आणि वातानुकूलित बैठक व्यवस्था यांमधील तिकीट दराच्या फरकाची रक्कम मिळू शकते.
जर प्रवाशांनी ई- तिकीट बुकींग केले असेल, तर प्रवाशांनी त्यांच्या पोहोचण्याच्या ठिकाणवेळेतील 20 तासांच्या आत टीडीआरसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच तिकीट चेकींग स्टाफकडून तिकीटाचे चेकींग झाल्याची एक प्रत आयआरटीसीच्या इंटरनेट तिकीटींग सेंटर, दिल्ली येथे पाठवणे गरजेचे आहे. तसेच आय तिकीट बुकींग केलेल्या प्रवाशांनाही तिकीट तपासणी झाल्याची एक प्रत रेल्वे विभागाकडे पाठवावी लागणार आहे. त्यानंतर रेल्वे विभागाकडून संबंधित रेल्वेच्या झोनल कमांडींग अधिकाऱ्यांकडून रेल्वे डब्ब्यातील एसीच्या निष्क्रियेबद्दल माहिती घेऊन प्रवाशांच्या अकाऊंटवर पैसे परत केले जातात.