एसी डबल डेकरला कोकण मुकणार?
By admin | Published: January 2, 2015 01:57 AM2015-01-02T01:57:56+5:302015-01-02T01:57:56+5:30
रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे कोकणवासीय एसी डबल डेकर ट्रेनला मुकणार असल्याचे आता दिसत आहे.
मुंबई : रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे कोकणवासीय एसी डबल डेकर ट्रेनला मुकणार असल्याचे आता दिसत आहे. डबल डेकरच्या डब्यांचे विभाजन करण्याचा रेल्वेकडून प्रयत्न सुरू असून तसे झाल्यास कोकण मार्गावर ही ट्रेन पुन्हा कधी सुरू होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डबल डेकरच्या डब्यांचे विभाजन करणाऱ्यावर रेल्वे बोर्डाचा आठवडाभरात निर्णय होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कोकणवासीयांसाठी एसी डबल डेकर ट्रेन प्रथम गणेशोत्सवात प्रीमियम म्हणून रेल्वेने सुरू केली. मात्र भाडे अव्वाच्या सव्वा होत गेल्याने कोकणवासीयांनी त्याकडे पाठच फिरवली. त्यामुळे या ट्रेनला प्रतिसाद द्या अन्यथा ती बंद करण्यात येईल, असा इशाराही कोकण रेल्वने दिला होता. त्यानंतर दिवाळीत ही ट्रेन नॉन प्रीमियम म्हणून चालवली आणि गर्दीचा हंगाम नसल्याने त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र आता गर्दीचा हंगाम असलेल्या हिवाळी सुटीत ही ट्रेन देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार डबल डेकरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हे फक्त पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमध्ये होत असल्याने ती सध्या कांदिवली यार्डमध्ये उभी केली आहे. थोड्याच दिवसांत डबल डेकर ट्रेन वर्कशॉपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येते. वर्कशॉपमधून एसी डबल डेकर ट्रेन बाहेर पडल्यानंतर तिच्या डब्यांचे विभाजन करण्याचे रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून तशा सूचनाही मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या ट्रेनचे दोन पॉवर कोच (जनरेटर कम गार्ड व्हॅन) असून ते दक्षिण विभागाकडे पाठवण्याबरोबरच त्याचे काही डबे पाठवण्यासही सांगितले आहे. काही डबे हे पश्चिम मध्य विभागाकडेही (भोपाळ-इंदौर) पाठवण्यासंदर्भात सूचना केली आहे. मात्र रेल्वेमंत्र्यांकडून त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.