एसीमध्ये बिघाड: ८ शस्त्रक्रिया रखडल्या
By admin | Published: September 13, 2014 12:10 AM2014-09-13T00:10:39+5:302014-09-13T00:10:39+5:30
सुपर स्पेशालिटी सेवा देण्याच्या नावाखाली नूतनीकरण करण्यात आलेल्या पालिकेच्या कळवा रुग्णालयाचे सुमार दर्जाचे काम शुक्र वारी पुन्हा उघड झाले आहे.
ठाणे : सुपर स्पेशालिटी सेवा देण्याच्या नावाखाली नूतनीकरण करण्यात आलेल्या पालिकेच्या कळवा रुग्णालयाचे सुमार दर्जाचे काम शुक्र वारी पुन्हा उघड झाले आहे. आॅपरेशन थिएटरच्या एसीमध्ये स्पार्किंग झाल्याने आॅपरेशनसाठी सकाळपासून ताटकळत बसलेल्या रु ग्णांना दुपारी आॅपरेशन न करताच वॉर्डमध्ये पाठवण्यात आले. या तांत्रिक कारणामुळे ८ आॅपरेशन रद्द करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली.
गेल्या काही दिवसांपासून या आॅपरेशन थिएटरमधील एसी मधूनमधून बंद पडत असल्याने याचा फटका गरीब रु ग्णांना बसत आहे. शुक्र वारी या आॅपरेशन थिएटरमध्ये ८ रु ग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होत्या. यापैकीच साजीद चौघुले या रु ग्णाला आठ दिवसांपूर्वी एका कारने धडक दिल्याने या अपघातामध्ये त्याच्या मांडीचे, खांद्याचे हाड तुटले आहे. शुक्र वारी सकाळी साडेसात वाजल्यापासून शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. साडेतीनपर्यंत रखडवल्यानंतर एसी खराब असल्याचे सांगून त्यांना पुन्हा वॉर्डमध्ये जाण्यास सांगितले. साजीदप्रमाणे अन्य सात जणांनादेखील हेच कारण देऊन परत पाठवण्यात आले. विशेष म्हणजे साजीदला वॉर्डमध्ये घेऊन जाण्यासाठी वॉर्डबॉय नसल्याने आपण स्वत: त्याला स्ट्रेचरवर घेऊन गेलो असल्याची माहिती त्याचा भाऊ इम्रान चौघुले यांनी दिली.
आठ महिने ते वर्षभरापूर्वी या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून याच कामांतर्गत एसी बसवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या एसीची पाच वर्षांची गॅरंटी असतानासुद्धा एसी खराब कसे झाले, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तक्की चेऊलकर यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला असताना त्यांनादेखील समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. यासंदर्भात रुग्णालयाच्या डीन सी. मैत्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही दिवसांपासून एसीमध्ये स्पार्किंग होत असून त्याच्या दुरु स्तीचे काम सुरू केल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)