लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नालासोपारा :पश्चिम रेल्वेच्या चर्चगेटला जाणाऱ्या विरार वातानुकूलित लोकलची एसी यंत्रणा बंद पडल्याने ती नायगाव स्थानकात अर्धा तास थांबली होती. बिघाड दुरुस्त न झाल्याने प्रचंड उकाड्यामुळे शेवटी लोकलचे दरवाजे उघडे ठेवूनच प्रवाशांना चर्चगेटला सोडण्यात आले.
सकाळी विरारवरून ९ वाजून ९ मिनिटांनी चर्चगेटसाठी सुटलेल्या एसी लोकलची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे प्रवासी घामाघूम झाले होते. शेवटी ही लोकल ९ वाजून २५ मिनिटांनी नायगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. प्रवासी आणि मोटरमन यांच्यात वादही झाला होता. स्टेशन मास्तरांनी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बोरीवली स्थानकात तंत्रज्ञ येऊन त्रुटी दूर करतील, असे आश्वासन देण्यात आले. मात्र बोरिवली स्थानकातही कुणी आले नाही. शेवटी लोकलचे दरवाजे उघडे ठेवून ती पुढे नेण्यात आली. मात्र दोन डब्यांचे दरवाजे उघडलेच नाही.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत ही घटना माहीत नव्हती. एसी सुरू होत नव्हता, पण नंतर पुढे तंत्रज्ञ पाठवून हा दोष दूर झाला आणि लोकल व्यवस्थित धावत होती, असा दावा पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केला आहे.