मुंबई : मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याणदरम्यान एसी लोकलला हिरवा कंदील दाखवला आहे. गुरुवारपासून या मार्गावर एसी लोकल धावणार आहे. सोमवार ते शनिवार रोज या लोकलच्या १० फेऱ्या होतील. जानेवारी, २०२०मध्ये ठाणे ते पनवेल एसी लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने मध्य रेल्वेच्या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली नव्हती. आता सीएसएमटी-कल्याणदरम्यान ही सुरू करण्यास मध्य रेल्वेने परवानगी दिली आहे.सोमवार ते शनिवार सकाळी ५.४२ ते रात्री ११.२५ दरम्यान एसी लोकलच्या रोज १० फेऱ्या होतील. यात दोन सीएसएमटी ते कल्याण, चार सीएसएमटी ते डोंबिवली आणि चार सीएसएमटी ते कुर्ला अशा फेऱ्या असतील. पहिली लोकल सकाळी ५.४२ला कुर्ल्यावरून सीएसएमटीसाठी सुटेल व ६.१२ला सीएसएमटीला पोहोचेल, तर शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री ११.२५ वाजता सुटून ११.५३ला कुर्ला येथे पोहोचेल. मध्य रेल्वेवर सकाळी वातानुकूलित लोकलच्या दोन फेऱ्या आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी इतर फेऱ्या सोडाव्यात, यावर विचार सुरू आहे.
मध्य रेल्वेवर एसी लोकल आजपासून धावणार; रोज १० फेऱ्या होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 5:47 AM