लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याणदरम्यान एसी लोकल रेल्वेला हिरवा कंदील दाखविला आहे. गुरुवारपासून या मार्गावर एसी लोकल धावणार आहे. सोमवार ते शनिवार रोज या एसी लोकलच्या १० फेऱ्या असणार आहेत.
जानेवारी, २०२०मध्ये ठाणे ते पनवेल एसी लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली नव्हती. आता सीएसएमटी-कल्याणदरम्यान ही लोकलसेवा सुरू करण्यास मध्य रेल्वेने परवानगी दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी वातानुकूलित एसी लोकलच्या दोन फेऱ्या आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी इतर फेऱ्या सोडण्यात याव्यात, यावर विचार सुरू आहे.
सोमवार ते शनिवार सकाळी ५.४२ ते रात्री ११.२५ दरम्यान एसी लोकलच्या रोज १० फेऱ्या होतील. यात दोन सीएसएमटी ते कल्याण, चार सीएसएमटी ते डोंबिवली आणि चार सीएसएमटी ते कुर्ला अशा फेऱ्या असतील. पहिली लोकल सकाळी ५.४२ कुर्ल्यावरून सीएसएमटीसाठी सुटेल व ६.१२ला सीएसएमटीला पोहोचेल, तर शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री ११.२५ वाजता सुटून ११.५३ला कुर्ला येथे पोहोचेल.