एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावण्याचा मार्ग मोकळा
By admin | Published: April 19, 2017 03:00 AM2017-04-19T03:00:52+5:302017-04-19T03:00:52+5:30
बहुचर्चित एसी लोकल (वातानुकूलित) चालवण्यास पश्चिम रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर, या मार्गावरील रुळांवरील चाचण्यांना (डायनॅमिक ट्रायल) रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात
मुंबई : बहुचर्चित एसी लोकल (वातानुकूलित) चालवण्यास पश्चिम रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर, या मार्गावरील रुळांवरील चाचण्यांना (डायनॅमिक ट्रायल) रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. त्यामुळे एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
५४ कोटी रुपये किमतीची व १२ डब्यांची एसी लोकल साधारपणे ११ महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. ही लोकल दाखल झाल्यानंतर लोकलमध्ये काही तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले. या समस्या सोडवण्यास काही दिवस लागल्यानंतर, एसी लोकलच्या कारशेडमध्येच चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, लोकलच्या चाचण्या कारशेडबाहेरही घेण्यात येणार होत्या, परंतु आरडीएसओ (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन) आणि भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड) कंपनीकडून काही तांत्रिक अडचणींमुळे कारशेडबाहेरही चाचण्या घेण्यास उशीर झाला. महत्त्वाची बाब म्हणजे, मध्य रेल्वेवर एसी लोकल धावण्याचे निश्चित असतानाच, एसी लोकल चालवण्यास मध्य रेल्वेने नकार दिला व पश्चिम रेल्वेने लोकल चालवावी अशी मागणी केली. त्यानुसार, पश्चिम रेल्वेने आपल्या मार्गावर लोकल विनाअडचण धावू शकते, असा सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे बोर्डाकडे चाचणीसाठी मंजुरी मागितली.
मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या चाचण्या सुरू आहेत आणि ८0 टक्के चाचण्या झाल्या असून, त्या सर्व यशस्वी झाल्या आहेत. १५ दिवसांनंतर ही लोकल पश्चिम रेल्वेकडे सुपुर्द केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांना विचारले असता, ८ दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेवर एसी लोकलची चाचणी घेण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या लोकलच्या चाचण्या घेण्याचे नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)