एसी लोकलच्या चाचणीचा मुहूर्त टळला
By Admin | Published: May 6, 2016 02:50 AM2016-05-06T02:50:59+5:302016-05-06T02:50:59+5:30
मध्य रेल्वेनेच्या ताफ्यात असलेल्या एसी (वातानुकूलित) लोकलची चाचणी १५ मेपासून सुरू होणार होती. मात्र चाचणीसाठी लागणारी कागदपत्रे रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर केली नसल्याने
- सुशांत मोरे, मुंबई
मध्य रेल्वेनेच्या ताफ्यात असलेल्या एसी (वातानुकूलित) लोकलची चाचणी १५ मेपासून सुरू होणार होती. मात्र चाचणीसाठी लागणारी कागदपत्रे रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर केली नसल्याने एसी लोकलच्या चाचणीचाच मुहूर्त टळला आहे.
एसी लोकल ठाणे-वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येईल आणि त्यापूर्वी याच मार्गावर प्रवाशांसह चाचणी केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली होती. सध्या कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल उभी करण्यात आली असून, डब्यातील विद्युत यंत्रणा आणि त्याच्या सॉफ्टवेअरमधील कामे पूर्ण झालेली नाहीत. त्याचप्रमाणे या लोकलची मोजमापे नियमित मोजमापांपेक्षा जास्त असल्याने त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे मुंबई दौऱ्यावर आले असतानाच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत एसी लोकलची चाचणी १५ मेपासून करण्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे मेपासून एसी लोकलची चाचणी सुरू होताच ती त्वरित सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची आशा निर्माण झाली होती. मात्र ही आशा मावळली आहे. याबाबत रेल्वेतील सूत्रांनी सांगितले की, चाचणी घेण्यासाठी मध्य रेल्वेला तशी कागदपत्रे मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पाठवावी लागतात. मात्र मध्य रेल्वेकडून कागदपत्रे अजूनही सुरक्षा आयुक्तांकडे पाठविण्यात आलेली नाहीत. या कागदपत्रांची पाहणी करून एक अहवाल लखनऊ येथील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पाठविला जातो. तेथे त्याची पडताळणी होऊन मग रेल्वे बोर्डाकडे पाठविला जातो. अहवालात कोणतीही अडचण नसेल तर रेल्वे बोर्डाकडून परवानगी दिली जाते. मात्र चाचणीसाठी ही परवानगी मिळण्यास साधारपणे १० ते १५ दिवस तरी लागतात. परंतु या अहवालात बोर्डाकडून काही शंका उपस्थित केल्यास त्यात आणखी काही दिवस वाढू शकतात. त्यामुळे १५ मेपासून चाचणी होण्याचे अशक्य असल्याचे सांगण्यात आले.
कागदपत्रे सादर झाल्याबाबत संभ्रम
याविषयी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांना विचारले असता, कागदपत्रे सादर केली असून, अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त (प्रभारी)सुशील चंद्र यांनी सांगितले की, चाचणीसाठी लागणारी कागदपत्रे मध्य रेल्वेकडून अद्यापही सादर झालेली नाहीत. ही कागदपत्रे सादर झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केल्या जातील.