AC लोकलची वर्षपूर्ती - वर्षभरात ४० लाख प्रवाशांचा ‘एसी’ प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 04:43 AM2018-12-21T04:43:47+5:302018-12-21T04:44:35+5:30
एसी लोकलची वर्षपूर्ती : दररोज ३ ते ४ लाख प्रवासी
मुंबई : ‘थंडगार प्रवास’ म्हणून पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल ओळखली जाते. २५ डिसेंबरला या एसी लोकलला एक वर्ष पूर्ण होत आहे. २५ डिसेंबर २०१७ पासून ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंत एसी लोकलमधून तब्बल ४० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. महिन्याला सरासरी ३ ते ४ लाख प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. एसी लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत १६ कोटी ६५ लाख रुपये जमा झाले आहेत.
१२ डब्यांच्या एसी लोकलच्या दिवसातून १२ फेऱ्या होतात. सहा गाड्या अप आणि सहा डाऊन मार्गावर धावतात. महालक्ष्मी ते बोरीवली एक गाडी धिमी असून ११ जलद लोकल गाड्या आहेत. एका दिवसात डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरार चार जलद गाड्या, चर्चगेट ते बोरीवली एक जलद गाडी धावते. अप मार्गावर विरार ते चर्चगेट चार जलद गाड्या आणि बोरीवली ते चर्चगेट दोन जलद गाड्या धावतात. यामधून एका दिवसात सरासरी १७ हजार ८७२ प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक गाडीतून सरासरी १ हजार ५०० प्रवासी प्रवास करतात.
एसी लोकलमध्ये सुरक्षा यंत्रणा उत्तम असल्याने मुंबईकर एसी लोकलच्या प्रेमात पडले आहेत. आॅटोमॅटीक दरवाजे, आरामदायक आसन व्यवस्था, प्रत्येक बोगीत अग्निशमन यंत्रणा, जीपीएस सुविधा, प्रवासी संवाद, एलईडी वीज सुविधा, १०० किमी प्रति तास गती, साप्ताहिक व पाक्षिक पास काढण्याची सुविधा असल्याने एसी लोकलला प्रतिसाद मिळाला आहे.
तिकीट दर लोकलपेक्षा अधिक
च्एसी लोकलचा तिकीट दर नॉन एसीच्या प्रथम वर्गाच्या तिकीट दरापेक्षा १.२ पट आहे. एसी लोकल दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवार आणि शनिवारी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे सोमवारी पुन्हा नव्या रूपात एसी लोकल प्रवाशांना सेवा पुरविते.
च्एसी लोकल सुरुवातीच्या काळात मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भार्इंदर, वसई रोड या स्थानकांवर थांबविली जात होती. मात्र आता मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्राँट रोड, दहीसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा या स्थानकांवरही गाडी थांबविण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली आहे.