एसी लोकल १२ चाचण्यांमध्ये पास
By admin | Published: June 4, 2016 03:00 AM2016-06-04T03:00:01+5:302016-06-04T03:00:01+5:30
कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकलच्या प्राथमिक चाचण्यांना सुरुवात झाली असून यात शंटिंगसारख्या चाचणीचा समावेश आहे. जवळपास १६ विविध चाचण्यांपैकी १२ चाचण्यांत एसी लोकल
मुंबई : कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकलच्या प्राथमिक चाचण्यांना सुरुवात झाली असून यात शंटिंगसारख्या चाचणीचा समावेश आहे. जवळपास १६ विविध चाचण्यांपैकी १२ चाचण्यांत एसी लोकल पास झाली असून चार सॉफ्टवेअरच्या चाचण्या बाकी असल्याची माहिती रेल्वेतील
सूत्रांकडून देण्यात आली. तर कारशेडमधून बाहेर पडल्यानंतर जूननंतर एसी लोकलच्या मुख्य चाचण्यांना सुरुवात होईल.
या लोकलची चाचणी १६ मेपासून ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार होती. मात्र एसी लोकलच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्या असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी संबंधित कंपनीचे कर्मचारी परदेशातून बोलाविण्यात आले आणि सॉफ्टवेअरमधील समस्या सोडविण्यासाठी काम नुकतेच सुरू झाले. सध्या कुर्ला कारशेडमध्ये उभ्या असलेल्या या लोकलच्या मध्य रेल्वेकडून कारशेडमध्येच विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. यासंदर्भात रेल्वेतील सूत्रांनी सांगितले की, सॉफ्टवेअरमधील समस्या सोडविण्यात येत असतानाच कारशेडमध्ये मध्य रेल्वेकडून चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. सॉफ्टवेअरमधील समस्या याच महिन्यात सोडवून त्याचीही चाचणी घेतली जाईल. मध्य रेल्वेकडून १६ चाचण्या घेतल्यानंतर १ जुलै ते १५ जुलैपर्यंत पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या १६ चाचण्या आरडीएसओकडून (रीसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) घेतल्या जातील. कारशेडमधून बाहेर पडल्यानंतर २१ मुख्य चाचण्या या ठाणे ते कर्जत पट्ट्यात किंवा ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्याचा विचार आहे. मुख्य चाचण्यांसाठी साधारपणे एक ते दीड महिना लागू शकतो. (प्रतिनिधी)
सॉफ्टवेअरची डोकेदुखी
एसी लोकलच्या सॉफ्टवेअरच्या चार चाचण्या घेण्यात येत आहेत. मात्र यात एसी लोकल पास होणे गरजेचे आहे. बम्बार्डियर लोकल दोन वेळा अशा प्रकारच्या चाचण्यांत अपयशी ठरली होती. त्यामुळे त्यात बदल करावे लागले होते, असे सूत्रांनी सांगितले.