कोरोना रुग्णांसाठी एसी मिनी बेस्ट बसची झाली रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:47 PM2020-04-25T23:47:54+5:302020-04-25T23:48:04+5:30
बेस्टच्या ताफ्यात असलेल्या वातानुकूलित सात मिनी बसगाड्यांचे रूपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे.
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेला रुग्णवाहिकेची संख्या कमी पडू लागली आहे. अशा वेळी बेस्ट उपक्रम मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे. बेस्टच्या ताफ्यात असलेल्या वातानुकूलित सात मिनी बसगाड्यांचे रूपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. कोरोनाच्या संशयित अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला या बसगाडीमधून कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे.
मुंबईत दररोज सरासरी तीनशे ते साडेतीनशे लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यापैकी काही रुग्णांना तत्काळ वैद्यकीय उपचारांची गरज असते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने विलगीकरण कक्ष वाढविण्यावर भर दिला आहे. मात्र रुग्णवाहिकांची संख्या त्या तुलनेत कमी पडत आहे. लॉकडाउन काळातही बेस्ट बस सेवा सुरू असल्या तरी वातानुकूलित मिनी बस सेवा बंद आहे. त्यामुळे अशा २० मिनी बसगाड्यांचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याची मागणी बेस्टकडे करण्यात आली होती.
त्यानुसार अशा सात मिनी बसगाड्यांमधील आसने काढण्यात आली आहेत. अशा २० बसगाड्यांमध्ये रुग्णवाहिकेसाठी आवश्यक बदल बस आगारांमध्ये करण्यात येत आहेत. पुढील आठवडाभरात यामध्ये आवश्यक बदल करून मिनी वातानुकूलित बसगाड्यांची रुग्णवाहिका झालेली असेल. यामुळे कोविड १९ साठी राखीव ठेवलेल्या रुग्णवाहिकांवरील ताण कमी होईल, असा विश्वास बेस्ट अधिकाऱ्याने व्यक्त केला़
सद्य:स्थितीत मुंबईतील १०८ या रुग्णवाहिका सेवेच्या ९३ पैकी ६६ गाड्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांद्वारे दररोज सरासरी चारशे ते पाचशे संशयित, बाधित रुग्णांना केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यात येते.
बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या अत्यावश्यक सेवा म्हणून गणल्या जातात. यामुळे सध्या साडेतीन हजार बसगाड्यांपैकी १६५० बसगाड्या रस्त्यावर चालविण्यात येत आहेत.
वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ६५० बसगाड्या सोडण्यात येत आहेत. तसेच मुंबईतील काही भागांमध्ये पालिकेमार्फत किराणा सामान पोहोचविण्यासाठी बेस्टच्या सहा बसगाड्या वापरण्यात येत आहेत.