एसी, पॅकबंद शिवनेरी बस नको रे बाबा! अद्ययावत सेवा उरली केवळ नावापुरतीच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:47 AM2021-04-01T03:47:48+5:302021-04-01T03:48:29+5:30
काेराेनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका एसटी महामंडळाच्या सर्वाधिक मागणी असलेल्या मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावरील एसी शिवनेरी बससेवेला बसला आहे.
मुंबई : काेराेनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका एसटी महामंडळाच्या सर्वाधिक मागणी असलेल्या मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावरील एसी शिवनेरी बससेवेला बसला आहे. शिवनेरी बसच्या तिकिटासाठी अक्षरश: दिवसेंदिवस वेटिंग करावी लागत असे. परंतु कोरोनाच्या भीतीने एसी, पॅकबंद शिवनेरी बस नको, असे म्हणत प्रवासी दूर जात आहेत. परिणामी, शिवनेरी बसची सेवा नावालाच उरली आहे.
सध्या या मार्गावर दिवसाला ७६ शिवनेरी बसमधून केवळ २,४०० प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यातून महामंडळाला ११ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. टाळेबंदीपूर्वी या मार्गावर दिवसाला ११० शिवनेरी धावत हाेत्या. जुलै २०१९ मध्ये शिवनेरीच्या भाडेदरात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात केल्याने दररोजची प्रवासीसंख्या २१ हजारांपर्यंत पोहोचली. फेब्रुवारी २०२० पर्यंत ही वाढ कायम राहिली. लॉकडाऊन बंद असलेला हा मार्ग गेल्या २० ऑगस्टपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी १०० प्रवाशांनी शिवनेरीतून प्रवास केला होता. हीच संख्या प्रतिदिन आता तीन हजारापर्यंत पोहोचली आहे. सध्याच्या घडीला या दोन्ही शहरांत काेरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे विविध खासगी आस्थापने, आयटीआय कंपन्यांचे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम हाेम’ करीत आहेत. शिवनेरीचा खरा प्रवासी हाच वर्ग आहे. त्यामुळे सध्या शिवनेरीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे.
शिवनेरी बस प्रवासी वाहतूक
कालावधी शिवनेरी बस दरराेजचे उत्पन्न दरराेज प्रवासी संख्या
जानेवारी २०२१ ७६ १३ लाख ३४ हजार २७३०
फेब्रुवारी २०२१ ७८ १४ लाख ७१ हजार २८७०
१ ते २१ मार्च २१ ७६ ११ लाख ६८ हजार २४००