Join us  

१५० रुपयांत गारेगार प्रवास! डॉ. आंबेडकर जयंतीला बेस्टची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:54 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रसह देशभरातून मुंबईत येणाऱ्या त्यांच्या अनुयायांना गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

मुंबई :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रसह देशभरातून मुंबईत येणाऱ्या त्यांच्या अनुयायांना गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. शिवाजी पार्क ते  दक्षिण मुंबई येथून पुन्हा शिवाजी पार्क अशी विशेष फेरी बेस्ट उपक्रम चालविणार आहे. केवळ १५० रुपयांत बेस्टच्या वातानुकूलित बसचा आनंद घेता येणार आहे.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त असंख्य अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट प्रशासनाने विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दादर ते चैत्यभूमी या मार्गावर सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत बसफेऱ्या चालविल्या जाणार आहेत तर छत्रपती शिवाजी पार्क ते  दक्षिण मुंबई सहा विशेष फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.दरम्यान, चैत्यभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांनी या बेस्टच्या विशेष सेवेचा फायदा घ्यावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कुठलीही अडचण येऊ नये यासाठी बेस्टचे अधिकारी तेथे उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले. 

...असा असेल मार्गदादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथून ही बस सुटेल. त्यानंतर प्लाझा, राजगृह, रुईया महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज (वडाळा डेपो), खोदादाद सर्कल, जिजामाता उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, गेटवे ऑफ इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मंत्रालय, एनसीपीए, गिरगाव चौपाटी, बाबुलनाथ, हाजी अली, वरळी, बीडीडी चाळ, दूरदर्शन, सिद्धिविनायक मंदिर, पोर्तुगीज चर्च, प्लाझामार्गे पुन्हा शिवाजी पार्क येथे बस येईल.

चैत्यभूमी येथे तिकिटाची सोयएसी बसमधून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी १५० रुपयांचे विशेष तिकीट विकत घ्यावे लागेल. कोणताही पास यासाठी चालणार नाही. तसेच विशेष बसच्या फेरीचे तिकीट चैत्यभूमी येथेही विकत घेता येणार आहे.