Join us  

एसी लोकलचा प्रवास लांबणार

By admin | Published: May 23, 2016 4:20 AM

पश्चिम रेल्वेवर दाखल होणारी एसी (वातानुकूलित) लोकल मध्य रेल्वेवर दाखल झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत येण्यास मात्र विलंब होणार आहे

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दाखल होणारी एसी (वातानुकूलित) लोकल मध्य रेल्वेवर दाखल झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत येण्यास मात्र विलंब होणार आहे. सध्या या लोकलच्या सॉफ्टवेअरचे काम सुरू असून, ते पूर्ण होण्यास थोडा अवधी लागेल आणि त्यानंतरच तिची चाचणी होणार आहे. त्यामुळे मे अखेपर्यंत चाचणी पूर्ण होऊन त्वरित प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल होणार असल्याची गेली २ वर्षे चर्चा सुरू होती. चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये बनलेली एसी लोकल मध्य रेल्वेवर एप्रिल महिन्यात दाखल झाली. या लोकलची १६ मेपासून ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र ही चाचणी अद्यापही होऊ शकलेली नाही. या लोकलच्या सॉफ्टवेअरमध्ये समस्या असून, त्यात बदल करण्यात येत असल्यानेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी स्पष्ट केले होते. एसी लोकलमधील इन्सुलेटर गेट बायपोलर ट्रान्झिस्टर (आयजीबीटी) स्वीचचे (पॉवर स्वीच) काम व्यवस्थित होत नसल्यानेच लोकलच्या चाचण्यांना ब्रेक लागला आहे. हा बिघाड दूर करण्यासाठी त्याचे सॉफ्टवेअर तयार केलेल्या कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार त्यांचे अभियंते मुंबईत दाखल झाले असून, एसी लोकलच्या सॉफ्टवेअरमधील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.