‘आरटीई’साठी ३१ मेपर्यंत अर्ज करा; मुंबईत पाच हजार ६७० जागा, जुन्या अर्जांचा विचार होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:01 AM2024-05-18T10:01:44+5:302024-05-18T10:05:57+5:30

मुंबईतील ३१९ पात्र शाळांत ‘आरटीई’च्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाच हजार ६७० जागा उपलब्ध आहेत.

academic year 2024-2025 addmission proccess under rte has started from may 17 apply before may 31 in mumbai | ‘आरटीई’साठी ३१ मेपर्यंत अर्ज करा; मुंबईत पाच हजार ६७० जागा, जुन्या अर्जांचा विचार होणार नाही

‘आरटीई’साठी ३१ मेपर्यंत अर्ज करा; मुंबईत पाच हजार ६७० जागा, जुन्या अर्जांचा विचार होणार नाही

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला १७ मेपासून सुरुवात झाली असून, ३१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यापूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पालिका शिक्षण विभागाने केले आहे. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असला तरी त्याचा या प्रवेशप्रक्रियेत विचार केला जाणार नाही. त्यामुळे नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील ३१९ पात्र शाळांत ‘आरटीई’च्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाच हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. यापूर्वी २०२४-२०२५ या वर्षाकरिता ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशप्रक्रियेसाठी पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.  त्यामुळे यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असला, तरी बालकांच्या पालकांनी नव्याने प्रवेश अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जाचा २०२४-२५ या वर्षाच्या सुधारित आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. 
प्रवेशप्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

...तर प्रवेश होणार रद्द

यापूर्वीच ज्यांनी ‘आरटीई’ २५ टक्केअंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेशप्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी केले आहे.

Web Title: academic year 2024-2025 addmission proccess under rte has started from may 17 apply before may 31 in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.