मुंबई : शिक्षणमहर्षी चिंतामण त्र्यंबक येवलेकर यांचे १६ आॅगस्ट रोजी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.येवलेकर सर या नावाने शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या चिं. त्र्यं. यांचे रूपारेल महाविद्यालयाशी अतूट नाते होते. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही ते विलेपार्ले येथील अनेक संस्थांशी संलग्न होते. लोकमान्य सेवा संघाचे ते माजी कार्याध्यक्ष होते. शिवाय सोबती या संस्थेचे व सावरकर केंद्राचे ते सक्रिय सदस्य/पदाधिकारी होते.अंधेरी पूर्वेतील पारसीवाडा वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी त्यांचे असंख्य विद्यार्थी व चाहते उपस्थित होते. येवलेकर सरांच्या आठवणी जागवण्यासाठी शनिवारी, १९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता विलेपार्ले येथे शोकसभा होणार आहे.विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष राजन शिरोडकर यांनी सांगितले की, येवलेकर सर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आधारवड होता. त्यांचे प्रशासन व्यवस्थेविषयीचे ज्ञान आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरचा वचक यामुळे ते प्रत्येक विद्यार्थ्याला जवळचे वाटायचे. कलाकार अशोक हांडे म्हणाले, सरांनी आम्हाला कोणत्याही परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा ही दिलेली शिकवण आयुष्यात उपयोगी पडली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव दिल्यामुळे विजय चव्हाण, विजय कदम, मधुरा वेलणकर, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, श्रीधर फडके अशा अनेकांना घडविण्याची ऊर्जा दिली.
शिक्षणतज्ज्ञ चिं. त्र्यं. येवलेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 2:03 AM