लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दक्षिण मुंबईतील बारमालकाविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मात्र परमबीर यांच्याविरोधातही गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींचे सत्र सुरू झाले. राज्य शासनाच्या परवानगीने ‘एसीबी’कडून परमबीर यांची खुली चौकशी सुरू आहे. यातच पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून एसीबीने दक्षिण मुंबईतील बारमालकाविरुद्ध लुक आउट नोटीस जारी केली आहे.
डांगे यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ‘डर्टी बन्स सोबो’ या पबवर २२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर रोजी कारवाई केली होती. कारवाईदरम्यान पबचा मालक जीतू नावलानी याने परमबीर यांच्यासोबत ‘घरके रिलेशन है’ असे सांगून कारवाईस विरोध केला. पुढे, तेथे धडकलेल्या त्याच्या अन्य दोन मित्रांनी पोलिसांना दमदाटी केली. शिवाय, मारहाणही केली. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले. पुढे हाच गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव वाढला.
या प्रकारानंतर २५ नोव्हेबर रोजी एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंह यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा फोन केला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगताच, तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेटीला जाण्यास नकार दिला. त्याबाबत संबंधित एसीबी कार्यालयात कळविण्यात आले. त्यानंतर परमबीर सिंह यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच, माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली. पुढे ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. त्यापाठोपाठ १८ जुलै रोजी माझे निलंबन झाले. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दूल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे दोन कोटींची मागणी केल्याचा आरोप यात केला आहे. त्यानुसार एसीबीकडून तपास सुरू आहे. नुकतेच, परमबीर यांच्यासह सातजणांविरुद्ध मुंबईच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यातही सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.