छगन भुजबळ यांच्या दोषमुक्ततेच्या अर्जाला एसीबीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:09 AM2021-08-14T04:09:48+5:302021-08-14T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पुरावे असल्याचा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळांनी विशेष न्यायालयात दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्जाला शुक्रवारी विरोध केला.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आपल्यावर कारवाई करण्याइतपत तपास यंत्रणेकडे पुरावे नाहीत, असा दावा करत छगन भुजबळ यांनी दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात काही दिवसांपूर्वी अर्ज केला आहे.
या अर्जाला एसीबीने विरोध केला. भुजबळ व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महाराष्ट्र सदनचे नूतनीकरण करणारे कंत्राटदार के. एस. चमणकर इंटरप्रायझेस यांनी लाच दिल्याचे पुरावे एसीबीकडे आहेत, असे एसीबीने म्हटले.
या याचिकेवर पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.
या प्रकरणातील मूळ तक्रारदार अंजली दमानिया यांनी या अर्जात हस्तक्षेप करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. न्यायालयाने त्यांना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यास सांगितले.
३१ जुलै रोजी याच प्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी विकासक मेसर्स के. एस. चमणकर एंटप्रायझेसच्या चार भागीदारांची दोषमुक्तता केली. कंत्राटदाराने कोणतीच अनियमितता केली नसून विकासकाला कोणताच अनुचित लाभ दिला नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने चार जणांना दोषमुक्त केले.
विकासकाने या प्रकरणात आरोपी असलेले तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुतणे, मुलगा किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना १३.५ कोटी रुपये दिल्याचा पुरावा नाही, असे निरीक्षण न्यायालयाने कृष्णा चमणकर व त्यांच्या कुटुंबीयांची दोषमुक्तता करताना नोंदविले.
''असे दिसते की १३.५ कोटी रुपयांचा अवाजवी फायदा आरोपी नंबर १ (छगन भुजबळ) आणि १२ ते १७ (पंकज भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इराम शेख आणि संजय जोशी) यांच्यापर्यंत पोहचला आहे,'' असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.