लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या काळात बंद पडलेल्या संत रोहिदास भवनाच्या बांधकामास गती देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईत परळमध्ये बांधण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस मुंडे यांच्यासह आमदार मंगेश कुडाळकर, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
परळ येथील संत रोहिदास भवनाच्या बांधकामास सुरुवात झाली होती. परंतु लॉकडाऊनमुळे हे बांधकाम थांबले होते. आता डी.सी.पी.आर. २०३४ अंतर्गत सदर प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. तसेच आता बांधकामास आवश्यक त्या सर्व परवानगी देण्यात आल्या आहेत. निधीही देण्यात आला आहे. त्यामुळे या बांधकामास गती देऊन संत रोहिदास भवनचे बांधकाम लवकर पूर्ण करावे, असे मुंडे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.