प्रथमोपचार, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरू असून, आता या मेट्रोसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या प्रशिक्षणात आपत्कालीन प्रशिक्षणासह उर्वरित महत्त्वाच्या प्रशिक्षणाचा समावेश असून, प्रशिक्षण वेगाने सुरू आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार, ओ अँड एम कर्मचाऱ्यांच्या बॅचने सिटी इन्स्टिट्यूट ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट, एमसीजीएम-परळ येथे प्रथमोपचार, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केले. मुंबई मेट्रोचा संपूर्ण प्रवास सुखकर करण्याच्या उद्देशाने पॉइंट मशीनची देखभाल करणाऱ्या सिग्नलिंग तंत्रज्ञांसाठी टीमने बीएमआरसी येथे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. मेट्रो चाचण्यांच्या तयारीसाठी टीमला सज्ज करण्याच्या दृष्टीने विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या चाचण्यांसाठी तयार ठेवण्याच्या दृष्टीने शिंपोली मेट्रो स्टेशनवर पीएसटी टीमने अलीकडेच कॅटेनरी वायरिंगच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तज्ज्ञांमार्फत प्रत्यक्ष साइटवर प्रशिक्षणे घेण्यात येत आहेत. ऑपरेशन टीम गर्दीचे व्यवस्थापन तसेच रांगेच्या पद्धतीचे विश्लेषण करत असून या कार्यपद्धती सुलभ करण्यास प्रारंभ केला आहे. तिकीट सेवांपासून मेट्रो प्रवासापर्यंत प्रत्येक मुंबईकरांना सहज सुलभ प्रवास करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी सेवांसाठी निरंतर वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीनेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
--------------