मुंबई: गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने करायच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना, या कामांना गती देऊन ती वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
यंदा अल निनोसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याने पाऊस दरवर्षीच्या तुलनेत कमी पडेल अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वेळीच जलसंधारणाच्या कामांना गती देऊन ती वेगाने पूर्ण करावीत असं एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत संबंधित प्रशासकीय अधिकाराऱ्यांना सांगितले. तसेच केलेल्या कामांचा दर्जा चांगला असावा व त्यात तक्रारी येऊ नयेत यासाठी सर्व विभागांनी दक्ष रहावे अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिल्या.
नुकसानग्रस्तांना १० दिवसांत मदत -
सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत १० दिवसांत वाटप करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि पुणे विभागांतून राज्य सरकारकडे ३१२८ कोटी ९६ लाख रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. पावसाने नुकसानीसाठी देण्यात येणाऱ्या मदतीसाठी शास्त्रीय निकषानुसार प्रस्ताव मंजूर करण्यात येतील.