मेट्रो-३ मार्गिकेच्या कामाची गती वाढवा- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 04:55 AM2020-03-01T04:55:37+5:302020-03-01T04:55:44+5:30
मेट्रो-३ मार्गिकेवरील पॅकेज ६ अंतर्गत येत असलेल्या सहार मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट देत कामाचा आढावा घेतला
मुंबई : मेट्रो-३ मार्गिकेवरील पॅकेज ६ अंतर्गत येत असलेल्या सहार मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट देत कामाचा आढावा घेतला आणि कामाची गती वाढावा,अशी सचूना संबंधितांना केली. या वेळी त्यांनी मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामासह इतर कामांचाही आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासोबत इतर मंत्री, पदाधिकारी आणि एमएमआरसीचे अधिकारीही उपस्थित होते.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ या मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) सुरू आहे. या मेट्रो-३ मार्गिकेच्या सहार रोड मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भेटीदरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम कशा पद्धतीने चालते, टनेलिंग कसे केले जात आहे, यामध्ये मनुष्यबळ किती आहे याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत पाहणी केली. या वेळी त्यांनी येथील टनेलमध्ये जात भुयारीकरणाच्या कामाची पाहणी केली. या वेळी एमएमआरसीच्या कामाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढत समाधान व्यक्त केले. तर आदित्य ठाकरे यांनीही मेट्रोच्या कामाचे कौतुक करताना समाधान व्यक्त केले. तसेच मेट्रो-३ मार्गिकेचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. मेट्रो-बेस्ट आणि रेल्वेचे जाळे मुंबईकरांना लास्ट मैल कनेक्टिव्हिटीसाठी मदत करेल, असेही आदित्य या वेळी म्हणाले. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन व संसदीय कार्यमंत्री, पालकमंत्री, मुंबई उपनगर, अनिल परब, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल तसेच एमएमआरसीचे एस.के. गुप्ता आणि आर. रामना हे अधिकारी उपस्थित होते.
>पॅकेज-६ चे एकूण काम ५९ टक्के पूर्ण
सहार रोड स्थानकाचे भुयारीकरण ४८ टक्के पूर्ण झाले असून पॅकेज-६ चे एकूण काम ५९ टक्के पूर्ण झाले आहे. सहार रोड स्थानकाची लांबी २१८ मीटर असून रुंदी ३० मीटर आहे. मेट्रो मार्गिकेच्या ट्रॅकचे आंतरबदल (इनर चेंज) व्हावेत यासाठी सहार रोड ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) मेट्रो स्थानकादरम्यान भूमिगत सीझर क्रॉस ओव्हर बांधण्यात येत आहे. २६६ मीटर लांब
१६ मीटर रुंद असलेल्या सीझर क्रॉस ओव्हरचे बांधकाम न्यू आॅस्ट्रियन टनेलिंग
पद्धतीद्वारे करण्यात येत आहे.