मुंबई मेट्रोच्या कामाला गती द्या - महानगर आयुक्त श्रीनिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:19+5:302021-07-16T04:06:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रोची कामे वेगाने सुरु असून, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रोची कामे वेगाने सुरु असून, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्याकडून या कामाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. नुकतेच आयुक्तांनी मेट्रोच्या ४ च्या कामाची पाहणी केली असून, या पाहणीदरम्यान आयुक्तांनी मेट्रोच्या ४ च्या कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.
महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी मेट्रो ४ प्रकल्पाच्या विविध ठिकाणी सुरक्षा बॅरिकेटस बसविण्याबाबत चर्चा केली. शिवाय सुरक्षिततेच्या बॅरिकेटसमुळे वाहतूककोंडी होणार नाही याची दक्षता घ्या, अशाही सूचना केल्या. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत देखील होत असलेल्या बैठकांदरम्यान विविध प्रकल्पांवर चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध जंक्शनमधील सुधारणांची आणि शेजारच्या सोसायट्यांशी संबंधित इतर विकासात्मक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी देखील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. नुकत्याच झालेल्या बैठकीत आवश्यक त्या सर्व नियमावली सादर करण्याच्या कालमर्यादेवर चर्चा केली. शिवाय मेट्रो डेपोचे मुद्दे, चाचणी, कार्यान्वयन आदी मुद्यांवरही चर्चा केली गेली.
...................................
पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील पृष्ठभाग आणि सौंदर्याच्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला आहे. कलानगर फ्लायओव्हर, नंदादीप गार्डन, नरिमन पॉइंट - कफ परेड उन्नत प्रकल्प आणि वरळी - शिवडी उन्नत मार्गाविषयीदेखील सातत्याने चर्चा केली जात आहे.
..................................
श्रीनिवास यांनी मुंबईतील अंडरपास टी १ आणि टी २ विमानतळ टर्मिनलसाठी प्रस्तावित स्थळांना देखील भेटी दिल्या.