मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मिठी नदीच्या खालून सुरू असलेले भुयारीकरणाचे बहुतांश काम येत्या मार्च अखेरीस पूर्ण होईल, असे मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसीएल) करण्यात येत आहे. या संपूर्ण मार्गिकेवर भुयारीकरणाच्या कामाला आता गती आली आहे. मिठी नदीखालून तीन भुयारे बनवण्यात येणार आहेत. यामध्ये १.५ किमी लांबीची दोन भुयारे आणि १५४ मीटरचे तिसरे भुयार बनवण्यात येणार आहे.वांद्रे पूर्व येथील मिठी नदीच्या खालून भुयारीकरणाचे काम करणे हे एमएमआरसीएलसमोर मोठे आव्हान होते, मात्र हे आव्हानही एमएमआरसीएलने सहज पार केले आहे.
मेट्रो-३ मार्गिकेवरील धारावी आणि बीकेसीच्या दरम्यान मिठी नदीच्या खालून १.४ किमी लांबीचा भाग आहे. या दोन्ही मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी मिठी नदीच्या खाली भुयारीकरण करण्यात येणार आहे. हे काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरसीएलचे म्हणणे आहे.
बीकेसी आणि धारावीदरम्यान पाण्याखालून सुमारे २५ मीटर खालून मेट्रो जाणार आहे. मिठी नदीखालून १.५ किमीची दोन भुयारे आणि १५४ मीटरच्या तिसऱ्या भुयाराचा वापर स्टैबलिंग लाईनसाठी करण्यात येणार आहे. बीकेसी स्थानकापासून काही मेट्रो पुन्हा परत जाणार आहे. रद्द केलेल्या मेट्रो टेÑनचा मार्ग बदलण्यासाठी या मार्गाचा उपयोग करण्यात येणार आहे. या भुयारीकरणाचे काम टनेल बोरिंग मशीनतर्फे (टीबीएम) करण्यात येत आहे. तर काही भागांमध्ये नेटम ही तांत्रिक पद्धती वापरून भुयारीकरण तयार करण्यात आले आहे.