Join us  

घाईघाईत पालिका अर्थसंकल्प मंजूर

By admin | Published: March 22, 2015 12:25 AM

महापौर स्नेहल आंबेकर यांनी अर्थसंकल्प घाईघाईने मंजूर केला़ यामुळे संतप्त काँग्रेसच्या नगरसेविकांनी सभागृह तहकूब झाल्यानंतर महापौरांना त्यांच्याच दालनात जाताना धक्काबुक्की केली़

मुंबई : काँग्रेसच्या गोंधळात सुरू झालेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेची समाप्तीही गोंधळ, धक्काबुक्की आणि बाचाबाचीनेच झाली़ अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या मिनिटांपर्यंत आयुक्त सीताराम कुंटे यांना प्रशासनाची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही़ १२ वाजण्यास दहा मिनिटे असताना त्यांचे भाषण थांबवून महापौर स्नेहल आंबेकर यांनी अर्थसंकल्प घाईघाईने मंजूर केला़ यामुळे संतप्त काँग्रेसच्या नगरसेविकांनी सभागृह तहकूब झाल्यानंतर महापौरांना त्यांच्याच दालनात जाताना धक्काबुक्की केली़सन २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पावर गेल्या सोमवारी चर्चेला सुरुवात झाली़ परंतु अर्थसंकल्पातील वाढीव तरतुदीचा मोठा वाटा सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने लाटला़ यामुळे अर्थसंकल्पीय भाषणाच्या पहिल्या दिवसापासून काँगे्रसने गोंधळ घालण्यास सुरुवात केली़ महापौरांवर बोळे भिरकावणे, काँग्रेस नगरसेविकांचे निलंबन, काँग्रेस - शिवसेना नगरसेवकांमध्ये हाणामारी अशा प्रसंगाने सहा दिवस रणकंदन माजले़ अखेर हा वाद मिटेपर्यंत अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले होते़नियमानुसार अर्थसंकल्प २० मार्च रोजी मंजूर होणे बंधनकारक आहे़ त्यामुळे गेले सलग तीन दिवस पालिका महासभेत नगरसेवकांची अर्थसंकल्पीय भाषणे सुरू होती़ मात्र शुक्रवारी रात्री ११़५० वाजता आयुक्तांना बोलण्याची संधी देण्यात आली़ परंतु १२ च्या आत अर्थसंकल्प मंजूर करणे आवश्यक असल्याने महापौरांनी मतदानही न घेता अर्थसंकल्प मंजूर केल्याने महापौरांना धक्काबुक्की करण्यात आली. (प्रतिनिधी)आलेल्या नगरसेविकांनी महापौर दालनात जात असताना त्यांचा रस्ता अडवून त्यांना धक्काबुक्की केली़ (प्रतिनिधी)अर्थसंकल्पीय चर्चेत पहिल्या दिवसापासून महापौरांची मनमानी सुरू होती़ विरोधी पक्षनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही महापौरांनी आपल्या दालनात येऊनच काँग्रेसच्या निलंबित नगरसेविकांनी माफी मागण्याचा हट्ट धरला होता़ अखेर महापौरांचा लाल दिवा काढण्याची मागणी काँग्रेसने आयुक्तांकडे केल्यानंतर महापौर नरमल्या़ अर्थसंकल्पही मतदान न घेताच मंजूर करण्यात आल्यामुळे काँग्रेस नगरसेविकांनी त्यांना धक्काबुक्की केली़ रात्रीच्या वेळेत महिला सुरक्षारक्षक नसल्यामुळे पुरुष सुरक्षारक्षकांचाही नाइलाज झाला़ अखेर शिवसेनेच्या नगरसेविका महापौरांच्या संरक्षणासाठी धावत आल्यानंतर हा वाद मिटला़अर्थसंकल्पात काय? : पायाभूत प्रकल्पांसाठी आर्थिक आधार असलेला जकात कर केंद्राच्या वस्तू व सेवा करामुळे संपुष्टात येत असल्याचा गंभीर परिणाम महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहेत़ त्यामुळे गलिच्छ वस्त्यांवर मालमत्ता कर, वाहतूक, साफसफाई आणि अग्निशमन उपकर भविष्यात वाढण्याचे संकेत प्रशासनाने अर्थसंकल्पातून दिले आहेत़ सुधारित मालमत्ता करातून ५७८ कोटींचा बोजा नुकताच मुंबईकरांवर टाकण्यात आला़