Join us

मेट्रो चाचण्यांसाठी प्रशिक्षणाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांवर धावणारे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कोच दिनांक २२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांवर धावणारे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कोच दिनांक २२ जानेवारी रोजी बंगळुरूहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, २७ जानेवारीपर्यंत ते चारकोप मेट्रो कारशेडमध्ये दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे प्राधिकरणाचे पाहणी दौरेदेखील वाढले असून, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७च्या चाचण्यांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे तसतसे टीमला प्रशिक्षणदेखील वेगाने दिले जात आहे.

बंगळुरू येथील भारत अर्थमुव्हर्स लिमिटेडकडे मेट्रो ट्रेनच्या निर्मितीचे काम सोपविण्यात आले आहे. मेट्रो २ अ आणि सात या मार्गांवरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या आघाड्यांवर चाचणी होईल. त्यानंतर मेपासून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, २०१४ साली घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर मुंबईत पहिली मेट्रो धावली. सात वर्षांनंतर दहिसर ते डी. एन. नगर (२ - अ) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर (७) या मार्गांवरील प्रवासी सेवा कार्यान्वित होत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी शुक्रवारी मेट्रो - २ अ च्या कामांची पाहणी केली. मेट्रोच्या चाचण्यांसाठी येथील कामे पूर्ण होत आहेत का? हे तपासण्यासह चाचण्यांसाठीच्या तयारीचा आढावा सेठी यांनी घेतला. मेट्रो चाचण्या सुरक्षित आणि वेळेवर सुरु करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाचा प्रत्येक अधिकारी कटिबध्द आहे. याचा परिणाम म्हणून पाहणी दौरे वाढविण्यात आले आहेत. ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आणखी वेगाने काम केले जात आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे मेट्रो २ अ आणि मेट्रो ७च्या चाचण्यांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे तसतसे टीमला प्रशिक्षणदेखील वेगाने दिले जात आहे. यात अग्निशमन प्रशिक्षणाचाही समावेश असून, आपत्कालीन तंत्राबाबतही माहिती दिली जात आहे.