वेग वाढविला; पण वाहने, रस्त्याच्या दर्जाचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:56 AM2020-03-02T00:56:15+5:302020-03-02T00:56:24+5:30
देशात २०१८ मध्ये एक लाख ५१ हजार जणांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला.
मुंबई : देशात २०१८ मध्ये एक लाख ५१ हजार जणांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यापैकी ९५ हजार मृत्यूंना वाहनाचा वेग कारणीभूत होता. देशासह परदेशातही वाहनाचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत काही ठिकाणी वेग वाढविण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे, पण हा निर्णय अपघातांना निमंत्रण देणारा ठरेल, असे मत युनायटेड वे संस्थेचे संस्थापक अजय गोवले यांनी व्यक्त केले. तसेच मुंबईत वाहनांचा वेग वाढविला, पण वाहने आणि रस्त्याच्या दर्जाचे काय, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी काही ठिकाणी वेग वाढविण्याचा निर्णय घेतला होता, तर आधीच्या वेगमर्यादेच्या तुलनेत मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरील वेगमर्यादा कमी करण्यात आली आहे. याबाबत अजय गोवले म्हणाले की, आपल्याकडे वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण वाहनाची क्षमता, दर्जा, फिटनेस तसाच राहणार आहे. याशिवाय रस्त्यांचा दर्जा आणि त्यातील अभियांत्रिकी दोष जैसे थे आहेत. त्यामुळे वेग वाढविण्याचा निर्णय घातक ठरू शकतो. रस्त्याचा दर्जा सुधारण्यासाठी बांधकाम खाते आणि पालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
>नियमानुसारच वेगमर्यादेत वाढ
केंद्र सरकारच्या नियमानुसारच मुंबईतील रस्त्यांवरील वेगमर्यादा वाढविण्यात आली आहे, पण मुंबईत वाहनांची संख्या अधिक आहे, तसेच रस्त्यात सिग्नल असल्यामुळे वर्दळीच्या वेळी वाहतूककोंडी होते. त्यामुळे वेगमर्यादेत वाढ करण्यात आली असल्याचे वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
>मुंबईतील प्रमुख रस्त्यांवरील वेगमर्यादा
मार्ग वेगमर्यादा
नेताजी सुभाषचंद्र मार्ग ६५
वांद्रे-वरळी सी-लिंक ८०
पश्चिम द्रुतगती मार्ग ७०
पूर्व द्रुतगती मार्ग ७०
सायन-पनवेल महामार्ग ७०
सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड ७०
मार्ग वेगमर्यादा
जे.जे. उड्डाणपूल ६०
ईस्टर्न फ्रीवे ८०
लालबाग उड्डाणपूल ७०
जगन्नाथ शंकर शेठ ७०
उड्डाणपूल दादर
नानालाल उड्डाणपूल माटुंगा ७०