गतिरोधकाने अपघाताला आवर
By Admin | Published: January 29, 2015 10:54 PM2015-01-29T22:54:00+5:302015-01-29T22:54:00+5:30
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशी नाका ब्रीज व तेथून १०० मीटर अंतरावर गणपती मंदिर वाशी नाक्याजवळ वेगवान येणा-या वाहनांची गती कमी करण्यासाठी
पेण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशी नाका ब्रीज व तेथून १०० मीटर अंतरावर गणपती मंदिर वाशी नाक्याजवळ वेगवान येणा-या वाहनांची गती कमी करण्यासाठी व होणारे अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण स्पॉट असलेला वाशीनाका येथे रम्ब्लिंग स्ट्रीप बसविले आहेत.
वाशी व उचेडे परिसरातील ग्रामपंचायत सरपंच, शेकाप युवा नेते सुनील गायकर, कामगार नेते डी. एम. म्हात्रे यांच्या मागणीला अखेर नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे अधिकारी नारायणकर यांनी मान्यता दिली आहे. अपघातप्रवण स्पॉट असलेल्या वाशीनाका येथे रम्ब्लिंग स्ट्रीप बसविल्याने महामार्गावरील वाशीनाका ब्रीज ते उंबर्डे फाटा येथील वाहतूक आता धीम्या गतीने होणार आहे. त्यामुळे अनेकांचा जीव घेणाऱ्या जागेने या गतिरोधकामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या परिसरातील समस्त नागरिक, ग्रा. पं. सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांनी नॅशनल हायवे अॅथॉरिटी अधिकाऱ्यांकडे वाशीनाका येथे गतिरोधक बसविण्याची मागणी लावून धरली होती. पेण पंचायत समितीच्या आमसभेत याबाबत जोरदार मागणीही करण्यात आली. त्यानुसार आ. धैर्यशील पाटील यांनी याबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली होती. त्यानंतर कामगार नेते डी.एम. म्हात्रे यांनी याबाबत प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा तहसील प्रशासनाला इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल प्रांत व तहसीलदार सुकेशिनी पगारे यांनी घेवून याबाबतचा अहवाल रायगड जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे पाठविला.
प्रशासकीय पातळीवरून तातडीने कार्यवाही करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग विभाग व नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या अधिकारीवर्गाला आदेश देवून वाशीनाका येथील महामार्गावर रम्ब्लिंग स्ट्रीप बसविण्यात आले. गायकर ब्रदर्सनी याकामी पुढाकार घेवून महामार्गावर रम्ब्लिंग स्ट्रीप बसविण्यासाठी मदत केली. गायकर, उंबर्डे ग्रा. पं. सदस्य जयवंत म्हात्रे, महेश पाटील, डी. एम. म्हात्रे व वाशी उचेडे परिसरातील युवकांनी सहकार्य केल्याने येथील धोका टळला आहे.
या युवा ब्रिगेडने चांगल्या कामासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सामान्य माणसातून यासाठी आ. धैर्यशील पाटील यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)