मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ येथील ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग ३ भुयारी प्रकल्पाचे टनेल बोअरिंग यंत्राच्या साहाय्याने खोदकाम सुरू असून १० मीटरचे भुयारी खोदकाम गुरुवारी पूर्ण करण्यात आले. १० नोव्हेंबर रोजी माहीम येथील नयानगर येथून मेट्रोच्या भुयारी मार्गाचे एका टनेल बोअरिंग मशीनने खोदकाम करण्यास सुरुवात झाली होती. मेट्रोच्या खोदकामासाठी भौगोलिक परिस्थितीनुसार या मशीनचा वेग ठरत असल्याने टनेल बोअरिंग मशीन दिवसभरात १ ते ४ मीटर वेगाने काम करत आहे. त्यामुळे शिवसेना भवनपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ११ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.मुंबई मेट्रो प्रकल्प ३ साठी एकूण १७ टनेल बोअरिंग मशीन वापरण्यात येणार आहेत. काम वेगाने करण्यासाठी ११० मीटर लांबीच्या टनेल बोअरिंग मशीनचा वापर महत्त्वपूर्ण आहे. भुयाराचे खोदकाम दोन वर्षांत पूर्ण होईल, असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने केला आहे. भुयारी काम पूर्ण झाल्यानंतर केबल्स आणि सिग्नलसारखे इतर मापदंड स्थापित करण्यात येतील. त्यानंतर ट्रॅक टाकण्यात येतील, वीजपुरवठा पुरवल्यावर मेट्रो सुरू होईल. मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावर २७ स्थानके असून २६ स्थानके भूमिगत आहेत. मुंबईमधील पहिलीच भुयारी मेट्रो सुरू होत असल्याकारणाने अनेक आव्हानांना सामोरे जाऊन परिस्थितीशी सामना करून काम करत आहोत. प्रत्येक गोष्टीचा अभ्यासपूर्ण विचार करून काम करण्यात येत आहे, असे मेट्रो-३ प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, माहिम मधील नया नगर येथे मेट्रो मार्ग ३ भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत १० मी. बोगदा खणण्यात आलेला आहे. अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कॉपोरेशनतर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली.नयानगर, माहीम येथील लॉन्चिंग शाफ्टमध्ये ३ टनेल बोअरिंग मशीन तर सिद्धिविनायक ते शीतलादेवीसाठी एक मशीनने काम सुरू केले असून दोन मशीन्स उतरवण्यात येणार आहेत. कुलाबा वूड्स, कफ परेड येथील लॉन्चिंग शाफ्टमध्ये २ टनेल बोअरिंग मशीन कफ परेड ते हुतात्मा चौकपर्यंत खोदकामासाठी उतरवण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल ते वरळीपर्यंतसाठी सायन्स म्युझियम येथे २ टनेल बोअरिंग मशीन उतरवण्यात येणार आहेत. विद्यानगरी, कलिना आणि पाली ग्राउंड मरोळ नाका येथे प्रत्येकी ३ टनेल बोअरिंग मशीन अनुक्रमे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते सांताक्रुझ आणि मरोळ नाका ते कार डेपोच्या खोदकामासाठी उतरवण्यात येणार आहेत. सहार रोड, अंधेरी पूर्व व आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील लॉन्चिंग शाफ्टमध्ये २ टनेल बोअरिंग मशीन अनुक्रमे शहरी विमानतळ ते आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ग्रँट रोडसाठी उतरवण्यात येणार आहेत.मेट्रो मार्गाचा प्रवास२०११ ते २०१३ या कालावधीमध्ये मेट्रोचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाला. केंद्र सरकारची मान्यता, मार्ग निश्चिती. जायका या वित्तसंस्थेकडून कर्ज मंजूर, राज्य सरकारची मंजुरी.२०१३ ते २०१७ या कालावधीमध्ये कंत्राटदारांची पूर्व पात्रता निवड, सल्लागाराची नियुक्ती. बांधकामासाठी निविदा मागवल्या. कंत्राटदारांची निवड, बांधकाम सुरू.२०१७ ते २०१९ या कालावधी दरम्यान भुयारी खोदकामाला सुरुवात करून भुयारी काम संपवणार२०१९ ते २०२१ या कालावधी दरम्यान बांधकामाची प्रगती, मेट्रो मार्गाची तपासणी अहवाल, मेट्रो सुरू.
मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग, अधिका-यांनी केली पाहणी, १० मीटर बोगद्याचे खोदकाम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 7:26 AM