Join us

कांदिवली-बोरीवली सहाव्या मार्गिकेला गती; झाडे तोडण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 11:43 AM

तीन किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेमुळे डाऊन दिशेला एक्स्प्रेस गाड्यांसाठी अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरीवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, त्याचे १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम २०२४-२५ या आर्थिक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तीन किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेमुळे डाऊन दिशेला एक्स्प्रेस गाड्यांसाठी अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार आहे.

पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरीवलीदरम्यान नव्या मार्गिकेसाठी ४२४ चौरस मीटर लांबीची खासगी जमीन संपादित केली आहे. बोरीवलीपर्यंत नव्या मार्गिकेच्या विस्तारामध्ये बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या आणि अडसर ठरणाऱ्या १२ घरांचे पाडकामही करण्यात आले आहे.

दरम्यान, सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे आतापर्यंत वांद्रे टर्मिनस ते गोरेगाव दरम्यान नऊ आणि गोरेगाव ते कांदिवली दरम्यान साडेचार किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भागातील काम पूर्ण झाल्यास एक्स्प्रेस गाड्यांसाठी नवीन मार्ग कार्यान्वित होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

झाडे तोडण्यास मंजुरी

सहाव्या मार्गिकेच्या कामाआड येणारी झाडे तोडण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली असून, हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाला गती येईल.

 

टॅग्स :पश्चिम रेल्वेबोरिवली