मुंबईतील ठप्प पडलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना गती; विविध कामांना प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:42 PM2023-10-31T13:42:20+5:302023-10-31T13:42:37+5:30
पूर्व उपनगरात एकूण २७ ठिकाणी कामांना सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कंत्राटदाराच्या चालढकलीमुळे बंद पडलेली शहर भागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे पालिका पुन्हा सुरू करणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये कार्यादेश देऊनही काम सुरू न केल्यामुळे पालिकेने कंत्राटदारावर कारवाई केली होती. दिरंगाईमुळे शहर भागातील रस्त्यांची कामे ठप्प पडली होती.
महानगरपालिकेने रस्ते सुधारणांसाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. ३९७ किलोमीटर अंतराच्या एकूण ९१० रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याकरिता जानेवारी २०२३ मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. ही कामे पाच मोठ्या कंत्राटदारांमार्फत केली जाणार आहेत. पश्चिम उपनगरात एकूण ९६ ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील ८३ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत.
१३ ठिकाणी वाहतूक मार्गाकरिता खोदकाम सुरू आहे. तेथेही काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरात एकूण २७ ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील १९ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे आहेत. ८ ठिकाणी वाहतूक मार्गाकरिता खोदकाम होत आहे. शहर विभागातील कामे न केल्याबद्दल कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तिथेही लवकरच काम सुरू करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
अन्यथा काळ्या यादीत टाकणार
मुंबईत अजूनही अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत, याकडे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना पत्रही पाठविले होते. त्यानंतर भाजपचे कुलाब्यातील नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही रस्त्यांची कामे सुरू झाली नसल्याची तक्रार केली होती.
त्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले. कंत्राटदाराला नोटीस पाठविण्यात आली असून खुलासा समाधानकारक नसल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे.