Join us

निम्माच ऐवज स्वीकारा!

By admin | Published: August 18, 2015 2:10 AM

मालवणीतील लॉजेसवरील कारवाईमुळे ‘मॉरल पोलिसिंग’चा विषय चर्चिला जात असताना घरफोडीतील एका गुन्ह्यात चोरट्यांकडून पूर्ण ऐवज मिळूनही

जमीर काझी, मुंबईमालवणीतील लॉजेसवरील कारवाईमुळे ‘मॉरल पोलिसिंग’चा विषय चर्चिला जात असताना घरफोडीतील एका गुन्ह्यात चोरट्यांकडून पूर्ण ऐवज मिळूनही केवळ निम्मा ऐवज स्वीकारावा, यासाठी वृद्ध फिर्यादी महिलेवर पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचे प्रकरण पुढे आलेले आहे. याप्रकरणी वारंवार पोलीस ठाण्यातील अधिकारी व परिमंडळ उपायुक्तांकडे पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने न्यायासाठी या महिलेने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे धाव घेतली आहे. संबंधितांची चौकशी करून गुन्ह्याचा तपास इतरांकडून करून घ्यावा, अशी मागणी या महिलेने केली आहे. गोवंडीतील ६० वर्षांच्या मंगलाबेन सावला या वृद्ध महिलेला न्यायासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. गेली सात महिने त्या शिवाजीनगर पोलीस ठाणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या येरझाऱ्या घालत आहेत. गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविण्यापासून तपासापर्यंत पोलिसाची भूमिका संशयास्पद आहे. वसूल झालेल्यापैकी काही ऐवज अन्य गुन्ह्यात, तर काही परस्पर हडप करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे. सावला दाम्पत्य लहान मुलांची खेळणी बनविण्याचा व्यवसाय करते. १९ जानेवारीला मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या कपाटाचे कुलूप तोडून रोख ८८ हजारांसह १७ तोळे सोने व चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य लंपास केले. चोरट्याने त्यांचे कामगार ज्या खोलीत झोपले होते, त्या खोलीची कडी बाहेरून लावून घेतली होती. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्या असता पोलिसांनी दागिन्यांचे बिल असल्याशिवाय एवढी चोरी झाल्याचे दाखवता येणार नाही, असे सांगत केवळ साडेसात तोळे व रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्यादी घेतली. पूर्ण दागिन्यांची नोंद घेण्याबाबत वारंवार मागणी केल्यानंतर पुरवणी जबाबात त्याची केवळ एका वाक्यात नोंद घेण्यात आली. त्यानंतर दोन फेबु्रवारीला पहाटे पुन्हा त्यांच्या घरी चोर येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होते़ त्यावेळी जाग आल्याने त्यांनी साहाय्यक निरीक्षक चव्हाण यांना मोबाइलवर फोन करून हा प्रकार सांगितला. पोलीस पाठवित असून अन्य एका अधिकाऱ्याचा मोबाइल नंबर देऊन त्याला फोन करण्यास सांगितले. त्यांना ही माहिती तत्काळ देऊनही पोलीस घटनास्थळी आले नाहीत. अखेर सावला कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे झाले आणि चोरटे पळून गेले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी १८ फेबु्रवारीला प्रगेशकुमार जयस्वाल व शहबाज मोमीन या दोघांना अटक करून चोरीला गेलेला ऐवज जप्त केला. त्यानंतर तपास अधिकारी भाट यांच्याकडून चोरांकडून वसूल केलेल्यांपैकी सोने-चांदीचे दागिने घेण्यासाठी बोलावून घेतले. मात्र त्यांच्याकडून पूर्ण ऐवज मिळत नसल्याने त्यांनी त्याबाबत ७ एप्रिलला पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना भेटून हा प्रकार सांगितला. त्यांच्या सूचनेनुसार परिमंडळ-६चे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांची दुसऱ्या दिवशी कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी सांगितल्यानुसार पुढे संबंधित वृद्ध महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब जाधव व भाट यांची भेट घेतली. मात्र ४-५ वेळा बोलावून या महिलेस नुसते बसवून ठेवण्यात आले. त्यामुळे त्या पुन्हा एका परिचिताला घेऊन २१ एप्रिलला या महिलेने निशाणदार यांचे कार्यालय गाठले. तेव्हा तर काहीही ऐकून न घेता निशाणदार यांनी या वृद्ध महिलेस शिवीगाळ करीत बाहेर जाण्यास सांगितले. पोलिसांनी तिसरा फरारी आरोपी सलमान शेखला १ जूनला गजाआड केले.