डॉ. तात्याराव लहानेंसह आठ अध्यापकांचे राजीनामे मंजूर; राज्य शासनाने काढले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 06:32 AM2023-06-04T06:32:48+5:302023-06-04T06:35:02+5:30
गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टर विरुद्ध नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख आणि माजी विभागप्रमुख असा संघर्ष सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर जे जे रुग्णालयाच्या नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख आणि प्राध्यापक डॉ. रागिणी पारेख आणि महाराष्ट्र अंधत्व प्रतिबंध अभियानाचे समन्वयक सेवानिवृत्त सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने या दोघांसह अन्य सात अध्यापकांचे राजीनामे शासनाने शनिवारी मंजूर करून त्यांना कार्यमुक्त केले. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे या दोघांसह सात अध्यापकांनी ३१ मे रोजी शासनाकडे राजीनामे दिले होते.
गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टर विरुद्ध नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख आणि माजी विभागप्रमुख असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. डॉ. लहाने यांची १३ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र अंधत्व प्रतिबंध अभियानासाठी समन्वयक म्हणून एक वर्षाच्या करारावर नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, त्यांनी स्वत:हून या पदाचा राजीनामा दिल्यामुळे शासनाने त्यांना या पदावरून कार्यमुक्त केले आहे. डॉ. पारेख यांची शासनात २० वर्षांपेक्षा अधिक सेवा दिली असल्याने त्या स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी पात्र ठरत होत्या. त्यानुसार त्यांनी शासनाकडे स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. शासनाने त्यांच्या या अर्जावर कार्यवाही करत त्यांचा अर्ज मान्य केला आहे. तसेच स्वेच्छा सेवानिवृत्तीकरिता ९० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ मधील नियम ६६ मध्ये केलेल्या सुधारित तरतुदीनुसार ९० दिवसांच्या नोटीस कालावधी कमी करण्यात आला असून डॉ. पारेख यांचा स्वेच्छा सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला.
त्याचप्रमाणे मानसेवी सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. प्रीतम सामंत, डॉ. दीपक भट, डॉ. शशी कपूर, डॉ. स्वरणजीत सिंग भट्टी, डॉ. हेमालिनी मेहता, डॉ. अश्विन बाफना यांचे आणि सहायक प्राध्यापक म्हणून करार तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या डॉ. सायली लहाने यांच्यासह सर्वांचे राजीनामे शासनातर्फे मंजूर करण्यात आले आहेत.
डॉ. रवी चव्हाण यांच्याकडे कार्यभार
सर जे जे रुग्णालयातील प्राध्यापक नेत्र शल्यचिकित्साशास्त्र पदाची जागा रिक्त झाल्याने प्रशासकीय कारणास्तव नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नेत्र शल्यचिकित्साशास्त्र प्राध्यापक डॉ. रवी चव्हाण यांच्याकडे जे जे रुग्णालयातील प्राध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.