... तर गणिताच्या पुस्तकातील बदल स्विकारा, नव्या संकल्पनेला अतुल कुलकर्णींचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 08:07 AM2019-06-19T08:07:25+5:302019-06-19T08:08:58+5:30
गणिताच्या पुस्तकात 21 ते 99 या संख्यांचे वाचन व शब्दात लेखन यात बदल केला आहे.
मुंबई - विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती कमी व्हावी, यासाठी बालभारतीच्या दुसरी इयत्तेच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात काही बदल सुचवण्यात आले आहेत. मराठीचे इंग्रजीकरण, मराठी अप्रिय करण्याचा घाट घालत करण्यात आलेला हा बदल मराठी भाषेची तोडफोड करणारा आहे, अशी तक्रार साहित्य वर्तुळातून केली जात आहे. मात्र, प्रसिद्ध अभिनेता आणि नेहमीच सामाजिक विषयांवर आपले मत मांडणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी बालभारती पुस्तकातील या बदलाचे स्वागत केले आहे.
गणिताच्या पुस्तकात 21 ते 99 या संख्यांचे वाचन व शब्दात लेखन यात बदल केला आहे. त्यानुसार, सत्त्यान्नवऐवजी नव्वद सात असे शिकवावे, असे सुचवण्यात आले आहे. शासनाने हा बदल थांबवावा, यासाठी निवेदन देण्याची भूमिकाही अनेकांनी जाहीर केली आहे. तर, भाषेची कोणत्याही प्रकारे तोडफोड होणार नसून, टीका करण्यापेक्षा बदल समजून घ्यावेत, असे आवाहन गणितज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. त्यात, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी गणिताच्या पुस्तकातील या बदलाचे स्वागत करत, बदल स्विकारायला हवा असे म्हटले. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन निलेश निमकर या शिक्षणतज्ञाचा लेख शेअर करत अतुल यांनी, ‘जर प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल तर या बदलाचे स्वागत करावे लागेल’, असे म्हटले आहे.
दरम्यान, ‘मराठी काका’ अशी ओळख असलेल्या अनिल गोरे स्वत: गणिततज्ज्ञही आहेत. ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या शिकवण्या घेतात. त्यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही या बदलला विरोध दर्शवत छापण्यात आलेली सर्वच नवीन पुस्तके फेकून द्यावीत, असे म्हटले आहे.