‘फेसबुक’ रिक्वेस्ट स्वीकारणे पडले महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:16+5:302021-07-08T04:06:16+5:30
मुंबई : अनोळखी महिलेची ‘फेसबुक’ रिक्वेस्ट स्वीकारणे अंधेरीतील व्यक्तीला चांगलेच महागात पडले. कॉलरने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली; मात्र ती ...
मुंबई : अनोळखी महिलेची ‘फेसबुक’ रिक्वेस्ट स्वीकारणे अंधेरीतील व्यक्तीला चांगलेच महागात पडले. कॉलरने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली; मात्र ती पूर्ण न केल्याने थेट त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याबाबत अंधेरी पोलीस चौकशी करत असून, अनोळखी व्यक्तीविरोधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी परिसरात राहणारे तक्रारदार ५७ वर्षीय रमण (नावात बदल) यांना रिया वर्मानामक महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठविण्यात आली. रमण हे वर्माला ओळखत नव्हते मात्र तरीही त्यांनी ती स्वीकारली. त्यांचा मोबाइल क्रमांकदेखील त्यांनी मेसेंजरवर शेअर केला. त्यानंतर २७ जून, २०२१ रोजी त्यांना वर्माच्या नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. त्यावेळी रमण आंघोळीला गेले होते. त्यांच्या नातवाने त्यांना मोबाइल आणून दिला आणि त्याच अवस्थेत त्यांनी तो कॉल उचलला. तेव्हा फोनवर एक महिला आक्षेपार्ह अवस्थेत उभी होती. जे पाहून रमणने फोन डिस्कनेक्ट केला.
त्यानंतर अनोळखी क्रमांकवरून त्यांना एक फोन आला आणि त्याने रमणकडे ५० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास रमणचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. म्हणून रमण यांनी कॉलरला व्हिडिओ पाठवण्यास सांगितला, जो न्हाणीघरातील त्यांचाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा घाबरून त्यांनी कॉलरला इतके पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले, तेव्हा २२ हजारात व्हिडिओ डिलीट करण्याचे वचन त्याने दिले. मात्र रमण ती रक्कमदेखील देऊ शकले नाही आणि अखेर एक दिवस त्यांच्या मित्राने फोन करून त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ साइटवर पाहिल्याचे सांगितले. तेव्हा रमण यांनी याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तपास सुरू आहे.