‘गुगल पे’वरील रिक्वेस्ट स्वीकारणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:51+5:302021-02-05T04:36:51+5:30
बँक खात्यातून पैसे लंपास : महिलेकडून एमएचबी पोलिसांत तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एका महिलेला ‘गुगल पे’वर रिक्वेस्ट ...
बँक खात्यातून पैसे लंपास : महिलेकडून एमएचबी पोलिसांत तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका महिलेला ‘गुगल पे’वर रिक्वेस्ट पाठवून तिने ती स्वीकारताच तिच्या बँक खात्यातून पाच हजारांची रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणी महिलेने एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दहिसरमध्ये तक्रारदार महिला पती आणि मुलीसह राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, त्या जेथे काम करतात तेथील बॉसला एका व्यक्तीकडून कंपनीचे काही पैसे येणे होते. मात्र ते पैसे त्यांनी तक्रारदार महिलेच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. कंपनीचे पैसे खासगी खात्यात जमा करण्यास महिलेने नकार दिला. मात्र अखेर मालकासमोर त्यांचे काही चालले नाही.
गेल्या आठवड्यात सी. सी. अव्हेन्यू नावाच्या कंपनीतून अमन कुमार नामक व्यक्तीने त्यांना ‘गुगल पे’वर लागोपाठ १० आणि २० हजार रुपयांसाठी रिक्वेस्ट पाठवली. मात्र पैसे आले नाहीत; त्यामुळे पुन्हा पाच हजार रुपयांसाठी त्याने रिक्वेस्ट पाठवली, जी तक्रारदार महिलेने स्वीकारताच त्यांच्या खात्यातून पाच हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज त्यांना आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी एमएचबी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पाेलीस अधिक तपास करीत आहेत.
............................