अंतर्गत मूल्यमापनावर प्रवेश द्या किंवा सीईटी सर्वांना बंधनकारक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:06 AM2021-05-30T04:06:30+5:302021-05-30T04:06:30+5:30

दहावीच्या विद्यार्थ्यांची मागणी; अकरावी प्रवेशासाठीच्या निकषांमुळे संभ्रम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदाच्या दहावीच्या निकालासाठी मूल्यांकनाचे धोरण ठरविण्यात आले ...

Access to internal assessment or make CET mandatory for all | अंतर्गत मूल्यमापनावर प्रवेश द्या किंवा सीईटी सर्वांना बंधनकारक करा

अंतर्गत मूल्यमापनावर प्रवेश द्या किंवा सीईटी सर्वांना बंधनकारक करा

Next

दहावीच्या विद्यार्थ्यांची मागणी; अकरावी प्रवेशासाठीच्या निकषांमुळे संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदाच्या दहावीच्या निकालासाठी मूल्यांकनाचे धोरण ठरविण्यात आले असून, दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत लागेल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले. दुसरीकडे अकरावी प्रवेशासाठीही सीईटीचा ऐच्छिक पर्याय देण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाच्या निकालाने समाधान होणार नाही, त्यांची श्रेणीसुधार योजनेंतर्गत कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर प्रचलित पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. मात्र, अंतर्गत मूल्यमापनावर अकरावी प्रवेश द्या किंवा सीईटी सगळ्यांना बंधनकारक करा, असा सूर विद्यार्थ्यांमध्ये आहे.

विद्यार्थ्यांनी मूल्यमापन पद्धतीचे स्वागत केले असले तरी सीईटी ऐच्छिक का ठेवली? ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळतील, त्यांच्या गुणांचा अकरावीसाठी काही उपयोग होणार नाही का? ज्यांनी सीईटी दिली नाही, मात्र अंतर्गत मूल्यमापनात त्यांना उत्तम गुण आहेत, त्यांना अकरावी प्रवेशात डावलले जाणार का? असे एका ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. अकरावी प्रवेशासाठीच्या निकषांमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली असून, सीईटी संदर्भात लवकरात लवकर स्पष्टता आणण्याची त्यांची मागणी आहे.

शिक्षण विभागाने जो निर्णय दहावी मूल्यांकनाबाबत घेतला आहे, तो नक्कीच चांगला आहे. मात्र, अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी संदर्भातील निर्णय बंधनकारक ठेवावा, असे वाटते. समान गुणवत्तेवरील प्रवेशासाठी ते आवश्यक आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात ९० टक्क्यांहून अधिक गुण असतील मात्र काही कारणास्तव ते सीईटी देऊ शकले नाहीत तर ते त्यांचे नुकसान असेल, असे मत नवी मुंबईतील नूतन मराठी विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी विवेक खुळे याने व्यक्त केले.

आमचा नववीचा निकाल चांगला लागला आहे. त्यावरून आमचे मूल्यमापन होणे योग्यच आहे, मात्र अचानक एमसीक्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने होणाऱ्या सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्यास त्याला जबाबदार कोण? अद्याप सीईटीचे प्रारूप, आराखडा, अभ्यासक्रम काहीच उपलब्ध नसताना ती कशी देणार? असा प्रश्न नेरूळमधील दहावीची विद्यार्थिनी सिद्धी चौधरी हिने उपस्थित केला. दहावीसाठी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती, तो अभ्यासक्रम सीईटीसाठी असणार का? शिवाय सीबीएसई, आयसीएसईच्या मुलांसोबत सीईटी देताना, त्यांचा अभ्यासक्रम, आमचा अभ्यासक्रम वेगळा असताना समानता कशी आणणार, असा प्रश्नही तिने उपस्थित केला.

* स्वरूप लवकर समजणे गजरेचे

शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या गुणांवर माझा विश्वास आहे. मात्र, अकरावीत लवकर प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार असेल तर किमान तिचे वेळापत्रक आणि कोणत्या विषयाला किती गुणांचे किती प्रश्न असतील, याचे स्वरूप लवकर समजायला हवे. ही प्रवेश परीक्षा सुरक्षित व्हावी.

- धनश्री कुलकर्णी, दहावी, नूतन मराठी हायस्कूल

* परीक्षेची तयारी नाही

प्रचलित पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा या परिस्थिती निवळल्यानंतर कधी होतील, याचा नेम नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर अकरावी प्रवेशासाठी आम्हाला परवानगी द्यावी. सीईटी परीक्षेची आमची अद्याप तयारी नाही, शिवाय ताेपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येणार की नाही, त्याबद्दलही सांगता येत नाही.

- प्रियांका कळंबे, दहावी, पांचोलिया हायस्कूल

..................................

Web Title: Access to internal assessment or make CET mandatory for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.