ऑलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबईतील १७ वर्षीय मालविका राज जोशी या मुलीने आत्मविश्वासाच्या आणि आईने दिलेल्या साथीच्या जोरावर चक्क मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळविला आहे. विशेष म्हणजे ती दहावीदेखील पास झालेली नाही. मात्र, तिने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये कौशल्य दाखविले आहे.
इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ इन्फॉरमेटिक्समध्ये तिने दोन रौप्य आणि एक कांस्य अशा तीन पदकांची कमाई केल्यानंतर मालविका हिला मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये स्कॉलरशिप मिळाली. तिने बॅचलर ऑफ सायन्स डिग्रीचा अभ्यासक्रम घेतला आहे. ऑलिम्पियाडमध्ये पदक मिळविणा-या विद्यार्थ्यांना या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश दिला जातो.
शाळेत नसताना चार वर्षापूर्वी अनेक वेगवेगळ्या विषयांवर शोध लावला. प्रोग्रामिंग हा त्यापैकी एक होता. प्रोग्रामिंग हा आवडीचा असल्याने त्यावर जास्त भर दिला. त्यानंतर बाकीच्या विषयांसाठी वेळ दिला, असे मालविकाने ईमेलद्वारे सांगितले.
मालविकाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रवेश मिळविणे अवघड गेले असते. कारण त्यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते.