Join us

संपूर्ण शरीराच्या स्कॅनिंगनंतरच मिळणार मुंबई विमानतळावर प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:29 AM

मुंबई विमानतळाच्या प्रवाशांना यापुढे विमानतळावर प्रवेश करताना फुल बॉडी स्कॅनर मधून प्रवेश करावा लागणार आहे.

मुंबई : मुंबईविमानतळाच्या प्रवाशांना यापुढे विमानतळावर प्रवेश करताना फुल बॉडी स्कॅनर मधून प्रवेश करावा लागणार आहे. याबाबत प्रायोगिक तत्त्वावर ही प्रक्रिया राबविण्यासाठी विमानतळ प्रशासनाने अशा प्रकारची सुविधा पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर फुल बॉडी स्कॅनिंग ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. सुरक्षा तपासणीसाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्याने, त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली. पूर्ण शरीराचे स्कॅनिंग करण्यासाठी लागणाऱ्या यंत्राचे उत्पादन करणाºया कंपन्यांनी ७ दिवसांत निविदा प्रक्रियेला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) यांनी परिपत्रक काढून विमानतळावर पूर्ण शरीराची तपासणी करणाºया स्कॅनरचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. या स्कॅनरद्वारे शरीरात लपविलेल्या वस्तू, शरीरावर लपवून ठेवलेल्या वस्तू त्वरित उघडकीस येऊ शकतील. सध्या धातू तपासणी दरवाजामधून जाताना व हाती वापरण्याच्या यंत्राद्वारे केवळ धातूच्या वस्तुंचा शोध घेता येतो. मात्र, या नवीन स्कॅनरद्वारे धातू नसलेल्या वस्तूदेखील शोधण्यात यश मिळणार आहे. त्यामुळे ही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रत्येकी एक कोटी रुपये किमतीच्या या फुल बॉडी स्कॅनरद्वारे प्रवाशाची पूर्ण तपासणी करता येणे शक्य होणार आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर स्कॅनर मशिन उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर, लवकरात लवकर त्याचा वापर करून प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या अमेरिकेत अशा प्रकारचे स्कॅनर विमानतळावर वापरले जातात.

देशात केवळ दिल्लीतीलइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या यंत्रणेची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी २०१० मध्ये घेण्यात येत होती. मात्र, व्यक्तिगत गोपनीयता व या स्कॅनरद्वारे होणाºया रेडिएशनच्या दुष्परिणामुळे ही चाचणी स्थगित करण्यात आली होती. आता ‘बीसीएएस’ने याबाबत खबरदारी घेत रेडिएशनचे प्रमाण अत्यल्प असेल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचा दावा केला आहे. या संदर्भात उत्पादकांकडून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जाबाबत प्रमाणपत्र देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रवाशांचा वेळ वाचण्यास होणार मदतनवीन प्रकारचे स्कॅनर आल्यानंतर प्रवाशांच्या तपासणीत सध्या लागत असलेला वेळ कमी होईल. प्रवाशांना केवळ या यंत्रामधून आत जाऊन पुढून बाहेर पडावे लागेल. यामध्ये संपूर्ण शरीराचे स्कॅनिंग होणार आहे. तपास यंत्रणांना संबंधित प्रवाशाचा संशय आल्यास, त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली जाईल.

टॅग्स :मुंबईविमानतळ