Join us  

प्रवेश आजपासून ‘अ‍ॅक्टिव्ह’

By admin | Published: June 22, 2017 5:30 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी यंदा नवीन कंपनीला कंत्राट दिल्यामुळे सुरळीत प्रवेश पार पडतील अशी आशा होती

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी यंदा नवीन कंपनीला कंत्राट दिल्यामुळे सुरळीत प्रवेश पार पडतील अशी आशा होती. पण, अकरावी प्रवेशाचा दुसरा अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यावर एकच गोंधळ उडाला. मुंबई विभागातील सर्वच शाळांमध्ये पाच दिवसांपासून उडालेल्या गोंधळामुळे बुधवारी पूर्ण दिवस प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. आता, गुरुवारी ही प्रक्रिया पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’ होणार आहे. पण, गुरुवारी संकेतस्थळ सुरळीत न झाल्यास अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक बदलण्याची वेळ शिक्षण उपसंचालक विभागावर येणार आहे. शुक्रवार, १६ जूनला अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरू झाला. पण, प्रत्येक दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरताच येत नव्हते. या तांत्रिक बिघाडांमुळे उपसंचालक कार्यालयाच्या नाकीनऊ आले होते. शाळा, शिक्षक आणि पालकांच्या सतत तक्रारी येत होत्या. बुधवारी या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी ‘नायसा’ या कंपनीकडून विशेष लक्ष देण्यात आले. तर दुसरीकडे शिक्षण उपसंचालक विभागानेही प्रयत्न सुरू केले. संध्याकाळी उशिरा याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला असून, त्यानुसार गुरुवारपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेकडे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्यातरी या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. मात्र गुरुवारीही गोंधळाचा कित्ता सुरूच राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत योग्य तो आढावा घेऊन गरज असल्यास प्रक्रियेत बदल करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, असे शिक्षण उपसंचालक विभागाकडून सांगण्यात आले.