Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी, भीषण अपघातात 3 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 03:33 PM2022-05-09T15:33:37+5:302022-05-09T15:34:50+5:30

प्रोपेलीन गॅस वाहून नेणारा टँकर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघाला होता

Accident : 3 killed in Mumbai-Pune Express tanker overturn | Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी, भीषण अपघातात 3 ठार

Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी, भीषण अपघातात 3 ठार

googlenewsNext

मुंबई/रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी एक केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आता पुन्हा एकदा एक्सप्रेस वेवरील बोरघाटात आज (9 मे) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरुन भरधाव येणाऱ्या केमिकल टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

प्रोपेलीन गॅस वाहून नेणारा टँकर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी, बोरघाटातील खोपोली एक्झिटनजीक गॅस टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो टँकर पलटी झाला. रस्त्यावर पलटी झाल्यानंतरही गॅस टँकरने पलिकडच्या लेनमधून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन गाड्यांना धडक दिली. या धडकेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोघांची ओळख पटली असून तिसऱ्या मृताचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. सागर जनार्धन देशपांडे, (वय 51 वर्षे), योगेश बी सिंह (वय 47 वर्षे, रा. पुणे) अशी ओळख पटलेल्या मृतांची नावं आहेत.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस यंत्रणा, देवदूत यंत्रणा आणि सामाजिक संस्था घटनास्थळी दाखल झाले होते. तर, या अपघातामुळे गॅस टँकरमधील गळतीची तपासणी करण्यासाठी केमिकल तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, संबंधित यंत्रणांनी क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजुला हटविला. त्यानंतर, वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. जवळपास 3 तासानंतर वाहतूक पूर्ववत झाल्याने महामार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. 
 

Web Title: Accident : 3 killed in Mumbai-Pune Express tanker overturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.