विहिरीच्या कमकुवत स्लॅबमुळे घडली दुर्घटना, स्थानिकांकडून खंत व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 05:41 AM2018-10-04T05:41:47+5:302018-10-04T05:42:38+5:30

स्थानिकांनी व्यक्त केली खंत : मृतांच्या नातेवाइकांना व जखमींना शासनाने आर्थिक मदत करावी

Accident due to the weak slab of the well | विहिरीच्या कमकुवत स्लॅबमुळे घडली दुर्घटना, स्थानिकांकडून खंत व्यक्त

विहिरीच्या कमकुवत स्लॅबमुळे घडली दुर्घटना, स्थानिकांकडून खंत व्यक्त

Next

सागर नेवरेकर

मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील दीक्षित रोड येथे रुईया परिवाराचा बंगला आहे. येथे ५० वर्षांपेक्षा जुनी विहीर असून येथे उत्तर भारतीय महिला दरवर्षी जितिया व्रत हा धार्मिक कार्यक्रम पिढ्यान्पिढ्या साजरा करीत आहेत. २ आॅक्टोबरच्या सायंकाळी हा कार्यक्रम करीत असताना विहिरीवरचा स्लॅब कोसळून तिघींचा मृत्यू झाला. तर काही महिलांना वाचविण्यात यश आले. मृतांमध्ये एकाच घरातील आई, मुलगी आणि एक तीन वर्षांची चिमुकली होती. मृतांच्या नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतांच्या नातेवाइकांना आणि जखमींना शासनाने मदत करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

रुईया बंगला हा १०० वर्षांपूर्वीचा असून त्याचे संपूर्ण बांधकाम लाकडांपासून करण्यात आले आहे. बंगल्याबाहेर एक विहीर असून या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही; मात्र इतर कामांसाठी केला जातो़ विलेपार्ले परिसरातील उत्तर भारतीय महिला पारंपरिक सण बंगल्यातील विहिरीजवळ साजरा करतात़ याला अनेक वर्षांची परंपरा आहे़ रुईया परिवारानेही या धार्मिक कार्यात कधी बाधा आणली नाही. परंतु घडलेला प्रसंग हा ओढवलेला अपघात होता. बचावकार्यात रुईया बंगल्यातील काही महिलांचाही समावेश होता. विहिरीवरच्या स्लॅबवर उभे राहण्यासाठी जागा कमी असल्याने बऱ्याच महिला आणि लहान मुले तेथून बाजूला उभी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, अशी माहिती बंगल्यातील रहिवासी मनोज रुईया यांनी दिली.

खासदार, आमदारांकडून मदत नाही
बचावकार्य करताना कुणी लाकडाचे ओंडके, रस्सी, साडी इत्यादींचा वापर करून महिलांना वाचविले. पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी आल्यावर स्थानिकांना तेथून बाजूला करण्यात आले.
मृत पावलेल्या व्यक्ती कुंकूवाडी एसआरए हाउसिंग सोसायटीमधल्या रहिवासी होत्या. सर्व गरीब घरचे असून रोजगारावर सगळ्यांचे पोट असल्याने आता या गरिबांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. कोणत्याही राजकीय पक्षांच्या आमदार आणि खासदारांनी मदत केलेली नाही.
शासनाने मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी कुंकूवाडी एसआरए हाउसिंग सोसायटीचे सचिव अकबर सोकिया यांनी केली आहे.

जितिया व्रत म्हणजे काय?
उत्तर भारतीय महिला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जितिया व्रत करतात. सूर्यास्तावेळी विहिरीजवळ पूजा करून हे व्रत सोडले जाते. यासाठी महिला आपल्या मुलांना घेऊन विहिरीजवळ एकत्र येतात. जितिया उपवास हा तीन दिवसांपर्यंत सुरू असतो. मुलांच्या सुरक्षेसाठी या व्रताला सर्वांत अधिक महत्त्व दिले जाते. जितिया व्रताला ‘जीवित्पुत्रिका व्रत’ असेही म्हटले जाते.

सिद्धेशला जीवरक्षक करा
दुर्घटनेवेळी विहिरीत उडी मारत स्वत:चा जीव धोक्यात घालून आठ महिलांचे प्राण सिद्धेश महाब्दी या वेटरने वाचवले होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच पार्लेकरांनी सिद्धेशचे कौतुक केले. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जितेंद्र जानावळे यांनी सिद्धेशच्या या कामगिरीबद्दल त्याला ‘जीवनरक्षक’ पुरस्कार दिला. पालिकेत त्याला जीवरक्षक म्हणून कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करणार आहेत़

पोलीस म्हणतात...
‘रुईया बंगला’ खासगी संपत्ती असून विहीर मालकाने ही पूजा आयोजित केलेली नव्हती. त्यांनी कोणालाही या ठिकाणी बोलावले नव्हते. त्यानुसार अपघातात मालकाकडून निष्काळजीपणा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे आम्ही सध्या या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस तपास अधिकाºयांनी दिली.

माझी पूजा फळली
मुलांना उदंड आयुष्य मिळावे म्हणून मंगळवारी पूजा आयोजित करण्यात आली होती. माझा ११ वर्षांचा मुलगा साहिल हा अपंग आहे. मी दरवर्षी पूजेसाठी त्याला घेऊन जाते. मात्र मंगळवारी मी त्याला नेले नाही. सव्वा चार वाजता मी पूजेला बसले आणि सव्वा सहाच्या सुमारास विहिरीचा स्लॅब तुटून सर्व जण पाण्यात पडले. त्यात मीदेखील होती. मात्र साडी आणि बांबूच्या आधाराने मला बाहेर काढण्यात आले. माझी पूजा फळली म्हणावी लागेल अन्यथा माझा साहिल तर यात वाचलाच नसता.

Web Title: Accident due to the weak slab of the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई