Accident: ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय, निवृत्त पोलिसाचा मृत्यू, बेफाम वाहनचालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 12:37 PM2023-06-29T12:37:43+5:302023-06-29T12:37:55+5:30
Mumbai: मुलुंडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत आणखीन एक बळी गेला आहे. चालकाने ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय देत झालेल्या अपघातात एका ७६ वर्षीय निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुलुंडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत आणखीन एक बळी गेला आहे. चालकाने ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय देत झालेल्या अपघातात एका ७६ वर्षीय निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी चालकाला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
मुलुंड पश्चिमेकडील महात्मा गांधी रोड परिसरातील नर्मदा देवी सोसायटीत तुकाराम सावंत (७६) हे मुलगा सविनय (४६), सून नीलिमा (४३) आणि नातू उर्वीस (१०) सोबत राहण्यास होते. ते १५ वर्षांपूर्वी मुंबई पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. ते नेहमी सायंकाळी सहा वाजता शंकराच्या मंदिरात देवदर्शन करून रात्री ९:०० च्या सुमारास घरी जेवणासाठी परतायचे.
२७ जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे ६ वाजता घराबाहेर पडले. मात्र, ९ वाजेपर्यंत घरी न आल्याने मुलाने कॉल करण्यास सुरुवात केली. कॉलला प्रतिसाद न मिळाल्याने वडिलांना शोधण्यासाठी ते घराबाहेर पडले. बी. पी. क्रॉस रोडने जात असताना रस्त्यामध्ये लोकांची गर्दी दिसून येताच त्यांनी तेथील पोलिसांकडे चौकशी केली. तेव्हा, अपघात झाला असून, ७० ते ७५ वर्षांच्या जखमी व्यक्तिला अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगितले. त्याने, तत्काळ रुग्णालयात धाव घेतली.
तेथे स्वतःचेच वडील असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनीही रुग्णालयात धाव घेतली. रात्री पावणे दहाच्या सुमारास सावंत यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी मुलाच्या तक्रारीवरून बुधवारी गुन्हा नोंदवत चालकाला अटक केली आहे.
बाइकस्वार जखमी
मुलुंड परिसरात राहणारा चालक आम्रेश यादव (२२) याला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. भरधाव वेगाने जात असताना त्याचा सावंत समोर येताच ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय गेला आणि अपघात घडला. सावंतसह दुचाकीलाही धडक बसली. यामध्ये दुचाकी चालकही जखमी असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.