ठेकेदाराच्या चुकांमुळे महामार्गावर अपघात
By admin | Published: February 19, 2015 12:49 AM2015-02-19T00:49:34+5:302015-02-19T00:49:34+5:30
मंगळवारी अपघात झाला. सूचना फलक व बॅरीकेड नसल्यामुळे कारचे चाक काँक्रीटीकरणामध्ये फसले, यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
नवी मुंबई : महामार्ग रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकांमुळे उरण फाट्याजवळ मंगळवारी अपघात झाला. सूचना फलक व बॅरीकेड नसल्यामुळे कारचे चाक काँक्रीटीकरणामध्ये फसले, यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
सायन - पनवेल महामार्गावर खारघरमध्ये टोलनाका सुरू झाला, परंतु रोडचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खारघर, उरण फाटा, नेरूळ व इतर ठिकाणी कामे अद्याप अपूर्ण आहेत. नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मंगळवारी उरण फाट्याजवळ रखडलेल्या दोन लेनच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. काम झाल्यानंतर सदर ठिकाणी सूचना फलक, बॅरीकेट लावण्याची आवश्यकता होती. सदर ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणेही आवश्यक होते. परंतु पुरेशी काळजी घेतली नसल्यामुळे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कार काँक्रीटीकरणामध्ये फसली. पूर्ण चाक रुतले होते. यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
ठेकेदाराच्या चुकांमुळे सदर प्रकार झाल्याचे निदर्शनास आले असून, याविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गत महिन्यामध्ये या ठिकाणी दोन वाहनांचा अपघात झाला आहे. पोलिसांनीही येथील अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास पत्र दिले आहे. रात्री झालेल्या अपघातानंतर आज सदर ठिकाणी जुजबी उपाययोजना करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी कारची चाके रुतली. सदर ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले नव्हते. अपघात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे निदर्शनास आले. अपघातास जबाबदार असल्याबद्दल संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.
- प्रणय तुडीलकर, उपशाखाप्रमुख
रखडलेली कामे लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारास नोटीस दिली आहे. अनेक वेळा लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावण्यासही सांगितले आहे.
- कोंडीराम पोपेरे,
वाहतूक पोलीस निरीक्षक, सीबीडी