मुंबई : वाहनाचे पीयूसी (पोल्यूशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र काढले नसेल आणि अपघात झाला तर विम्याचे क्लेम मिळवता येणार नाही, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अनेकांनी पीयूसी काढण्यासाठी धावपळही सुरू केली आहे. मात्र, पीयूसी नाही या कारणास्तव विमा कंपन्यांना क्लेम नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करत आयआरडीएआयने (इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया) या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
एम.सी. मेहता आणि युनियन आॅफ इंडिया यांच्यातील रिट अर्जावर सुनावणी देताना वाहन विम्याचे नूतनीकरण करताना पीयूसी असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. आयआरडीएआयने ६ जुलै २०१८ रोजी त्याबाबतचे परिपत्रक काढून विमा कंपन्यांना अवगत केले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे विमा कंपन्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी २० आॅगस्ट २०२० रोजी आयआरडीएआयने पुन्हा नव्याने परिपत्रक जारी केले आहे. मात्र, त्या परिपत्रकाचा आधार घेत पीयूसीबाबतच्या अफवा पसरल्या आहेत.
पीयूसी नसताना वाहनाला अपघात झाला तर विम्याचे क्लेम कंपन्या देणार नाहीत, असे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून त्याबाबतचे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे अनेकांनी पीयूसी काढण्यासाठी धावपळ सुरू झाली असून पीयूसी काढून देणाऱ्यांमध्येही चैतन्य पसरले होते.पीयूसी तपासणे बंधनकारकपीयूसी आणि विमा क्लेमचा कोणताही संबंध नाही. केवळ विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना वाहनाची पीयूसी तपासणे कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. पीयूसी नसेल या कारणास्तव कंपन्यांना क्लेम नाकारता येणार नाही, असे आयआरडीएआयने स्पष्ट केले आहे.